फलटण – सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, कोळकी (ता. फलटण) आणि लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डन यांच्या संयुक्त विद्यमाने आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून तीन दिवसीय प्रज्ञा योग (Intuition Process) शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुरेश बेदमुथा (अहिल्यानगर) यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना आर्ट ऑफ लिव्हिंग व प्रज्ञा योग विषयावर सखोल प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मानसिक, बौद्धिक व भावनिक विकासासाठी हे शिबीर अत्यंत उपयुक्त ठरले.
शिबिरात ८ ते १३ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ‘उत्कर्ष योग’, तर १४ ते १८ वर्षे वयोगटासाठी ‘मेधा योग’ प्रशिक्षण देण्यात आले. एकाग्रता वाढवणे, आत्मविश्वास निर्माण करणे, अंतर्ज्ञान जागृत करणे तसेच तणावमुक्त जीवनशैली स्वीकारून आनंदी जीवन जगण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी निवृत्त प्राचार्य रविंद्र येवले, सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका व लायन्स क्लब फलटण गोल्डनच्या अध्यक्षा ला. सौ. संध्या गायकवाड, प्राचार्य सौ. सुजाता गायकवाड, पर्यवेक्षक महेंद्र कातुरे, समन्वयिका सौ. आहिल्या कवितके, सौ. माधुरी माने, शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच समारोप प्रसंगी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना सुरेश बेदमुथा यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात प्राणायाम, सकारात्मक दृष्टिकोन, आनंदी जीवन, प्रेमळ संवाद, आई-वडिलांचा आदर व योग्य आहार यांचे महत्त्व विशद केले.
ज्ञानेश्वर जाधव यांनी सूत्रसंचालन केले. शिबीरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारसरणी, स्मरणशक्ती, एकसंघता व आत्मशिस्त वाढल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट प्रतिसादामुळे ही तीन दिवसीय कार्यशाळा अत्यंत उत्साही वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.













