फलटण : फलटण शहर व तालुक्यातील पत्रकारांच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे माजी आमदार, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष, शिवसंदेशकार कॉ. हरिभाऊ निंबाळकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धांचे आयोजन दि. ७ व ८ जानेवारी रोजी माजी आमदार श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल, (घडसोली मैदान), फलटण येथे करण्यात येत आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे विविध शासकीय\निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. अत्यंत उत्साही आणि खेळकर वृत्तीने या स्पर्धा नेहमीच पार पडल्या असून यावर्षीही यामध्ये तितकाच आनंद उत्साह आणि खेळकर होती राहणार असल्याचे संयोजकांनी आवर्जून सांगितले आहे.
या स्पर्धांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात येणार असून त्यानंतर फलटण शहर व तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय नेते यांच्या संघात प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संघांमध्ये नियमानुसार स्पर्धा होणार आहेत.
फलटण शहर व तालुक्यातील क्रिकेट प्रेमींनी दोन्ही दिवस या स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.






