


18 मीटरऐवजी फक्त 12 मीटरचा होतोय रस्ता; डिव्हायडरही गायब!
फलटण – बारामती-फलटण राष्ट्रीय महामार्ग क्र. 160 चे चौपदरीकरण काम अंतिम टप्प्यात आले असताना फलटण शहरातच या रस्त्याची रुंदी अचानक कमी झाल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. उंडवडीपठार–बारामती–फलटण असा तब्बल 36 किमीचा हा महामार्ग शेकडो कोटी खर्च करून उभारण्यात येत आहे. बारामतीकडून येणारा रस्ता 18 मीटर रुंद, डिव्हायडरसह, साईड पट्टी आणि सर्विस रोडसह बांधण्यात आला आहे. मात्र फलटण शहराच्या हद्दीत प्रवेश करताच हा रस्ता अवघा 12 मीटर करण्यात येत आसल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे.
फलटणला “बारामतीसारखा विकास” दाखवणाऱ्यांच्या दाव्यांवरच यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बारामती येथे 18 मीटर रुंद रस्त्याबरोबरच स्वतंत्र सर्विस रोड उभारण्यात आला असताना, फलटणमध्ये ना डिव्हायडर, ना साईड पट्टी, आणखी सर्विस रोडचा तर प्रश्नच नाही. त्यामुळे फलटणमधील विकास नेमका कोण थांबवतंय? असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.
विशेष म्हणजे, फलटण शहरातील निरा उजवा कालवा–बारामती पूल येथे 18 मीटर रस्त्यासाठी जुळेल असा मोठा पूल आधीच बांधून झाला आहे. मग रस्त्याचीच रुंदी कमी का करण्यात आली? कोणाच्या सांगण्यावरून हा बदल झाला? या कामातील ‘कट’ कोण लावतंय? असे प्रश्न आता तीव्र झाले आहेत.
दरम्यान, शहरातील नागरिकांत या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी असून संबंधित विभागाने व लोकप्रतिनिधीने याबाबत भूमिकेची स्पष्टता द्यावी,त्याचबरोबर रस्त्यांमध्ये नुकसान होणाऱ्या नागरिकांना नुकसान भरपाई देऊन रस्ता कायमस्वरूपी रुंद करावा अशी मागणी होत आहे.












