वडूज – खटाव पंचायत समितीमधील अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या कातरखटाव गणातून कातरखटाव ग्रामपंचायत सदस्य अर्जुन भीमराव दुबळे यांच्या पत्नी सौ. आरती अर्जुन दुबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
खटाव पंचायत समितीच्या सभापती पदासाठी अनुसूचित जाती महिला प्रवर्गाचे आरक्षण असल्याने कातरखटाव गणाला यावेळी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या गणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने कंबर कसली असून, आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना सौ. आरती अर्जुन दुबळे म्हणाल्या की,“माझ्या पंचायत समिती गणातील प्रलंबित रस्ते कामे, आरोग्य विषयक प्रश्न, पाणीपुरवठा तसेच शिक्षण क्षेत्रातील समस्या यावर प्राधान्याने काम करणार आहे. जर मी निवडून आले, तर अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी पंचायत समितीचे सभापती पद आरक्षित असल्याने सभापती म्हणून तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन. तालुक्यात मोठ्या प्रमाणात वंचित असलेल्या कुटुंबांसाठी रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीपणे राबवण्याचा माझा प्रयत्न राहील. पंचायत समितीला जिल्ह्यात अव्वल स्थानी नेण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.”
5860006559679170994.jpg)










