फलटण -फलटण येथील प्रसिद्ध कादंबरीकार तथा कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कारप्राप्त लेखक सुरेश पां. शिंदे यांच्या ‘सत्याचा आसूड’ या कादंबरीचे ज्येष्ठ साहित्यिक व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांनी विशेष कौतुक केले आहे.
नेमाडे यांनी नुकतेच पत्र पाठवून ‘सत्याचा आसूड’ ही कादंबरी त्यांच्या गाजलेल्या सर्ज्या कादंबरीप्रमाणेच श्रेष्ठ असल्याचे नमूद केले आहे. पत्रात ते म्हणतात, “मी ही कादंबरी वाचली. मला ती आवडली. या कादंबरीतील गावाकडची ग्रामीण भाषा उत्तम आहे. संवाद आणि तपशील यांचा प्रभावी वापर केल्यामुळे ‘मी’ला फार कमी जागा मिळाली आहे. यापुढेही एखादे मध्यवर्ती सूत्र पक्के करून नवीन कादंबरी लिहावी.”
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते नेमाडे सरांनी स्वतः कादंबरी वाचून अभिप्राय दिल्याने लेखक सुरेश शिंदे यांच्या साहित्यिक कार्याची ही मोठी पोहोचपावती मानली जात आहे. नेमाडे सरांनी कादंबरी वाचून पत्र पाठविल्याबद्दल सुरेश शिंदे यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
सत्याचा आसूड ही कादंबरी ‘सर्ज्या’ प्रमाणेच श्रेष्ठ – भालचंद्र नेमाडे
By Team LBNN
On: May 7, 2026 9:50 AM






