फलटण – फलटण तालुक्यातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे, सहकारी संस्था जेव्हा उदयास येते तेव्हा ती फक्त समाजातील एका घटकाचे कल्याण करत नाही तर समस्त समाजाचा कायापालट करण्याची ताकद सहकारामध्ये असते. याची जाण असणारे सहकार क्षेत्रातील अद्वितीय व्यक्तीमत्व म्हणजे दिलीपसिंह भोसले उर्फ भैय्यासाहेब यांचा सोमवार, दिनांक 14 ऑक्टोबर रोजी वाढदिवस संपन्न होत आहे.
परीसाचा लोखंडाला स्पर्श होताच त्याचे सोन्यात परिवर्तन होते असे म्हणतात आणि अमृत प्राशन केल्यावर व्यक्ति अजरामर होते. शास्त्रज्ञांनी परीस आणि अमृत शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांना ना परीस सापडला ना अमृत परंतु 100 पेक्षा जास्त मुलद्रव्ये त्यांना सापडली की ज्यामुळे त्यास विज्ञानामध्ये अधिक महत्त्व आहे. समाजमनाचही तसंच आहे. कांही व्यक्ति आपल्या परीसस्पर्शाने एखाद्या जीवनाचे सोने करतात तर संस्था नावारुपाला आणतात त्याचप्रमाणे त्यांच्या वाणीत अमृत भरलेले असते की ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला भुरळ पडते. फलटणच्या समाज जीवनात ज्यांनी आपल्या कार्याद्वारे स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे ती व्यक्ती म्हणजे दिलीपसिंह भोसले उर्फ भैय्यासाहेब.
युवक चळवळीतून त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा पाया घातला गेला त्यामुळे संघटना कुशलतेने त्यांनी विविध क्षेत्रात भरीव कार्य केले. उज्वल उद्यासाठी सृजनशील साहस आजही भैय्यासाहेब यांचेकडे आहे. भैय्यासाहेबांनी आरंभलेली आणि पूर्ण केलेली सर्व कार्ये ही ज्ञानिवंत व प्रात्यक्षिर्क आहेत. साहस आणि उद्योगप्रिय स्वभावामुळे संकटावर मात करुन मनाने स्विकारलेल्या कामाला तनमनाने वाहणारे, कामाच्या आखणीमध्ये पैसा, प्रकृती, प्रतिकुल परिस्थिती याची तमा ना बाळगता कार्याला पूर्णत्त्वाकडे नेण्यासाठी त्यांना कष्टाचे डोंगर उभे केले आहेत.
हरिबुवा महाराज यांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा, त्यांच्या चरणी मस्तक ठेऊन हॉटेल व्यवसायात त्यांनी सुरुवात केली.
1981 साली हॉटेल गुलमोहरची सुरुवात केली तर 1989 ला श्री सद्गुरुहरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेची सुरुवात स्वत:च्या घरात केली. यानंतर त्यांनी विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली. 31 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या पतसंस्थेचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. स्व.हणमंतराव पवार यांनी सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पतसंस्थेचा कारभार केल्याने सदरची पतसंस्था आदर्श पतसंस्था म्हणून गणली जाते. पतसंस्थेच्या माध्यमातून सहकारक्षेत्रात प्रवेश केला. अल्पावधीतच एका पाठोपाठ एक संस्था स्थापन करुन 17 संस्था उत्कृष्ट पद्धतीने कार्यरत आहेत. महाराजा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटीची स्थापना केली. त्याचाही शाखा विस्तार केला. फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को – ऑपरेटीव्ह सोसायटीच्यावतीने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील मल्टीस्टेट सहकारी संस्थांमधून उत्कृष्ट कामकाजाबद्दल दिला जाणारा नॅशनल अॅवॉर्ड 2017 चा बहुमानही या संस्थेस मिळाला. शिर्डी येथे सन 2017-18 या सालाकरिता महाराजा मल्टीस्टेटला ‘सहकार गौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले. सन 2018 या सालाकरिता अहमदनगर येथे ‘सह्याद्री अर्थरत्न’ या पुरस्काराने महाराजा मल्टीस्टेटला सन्मानित करण्यात आले. तसेच मा.भैय्यासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणार्या सहकार महर्षी हणमंतराव दि. पवार सहकारी कक्कुटपालन संस्थेस नुकतेच महाराष्ट्र शासनाच्यावतीने ‘सहकार भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सुविद्य पत्नी अॅड.सौ.मधुबाला भोसले (भाभीसाहेब) यांना ‘स्कॉलर पॉलिटीशिअन’ पुरस्काराने सातारा येथे सन्मानित करण्यात आले आहे. ही फलटणकरांच्यादृष्टीने अभिमानाची बाब आहे.
सद्गुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेच्या व श्री सद्गुरु प्रतिष्ठान संचलित ब्रिलीयंट अॅकॅडमी इंग्लीश मिडीयम स्कूलच्या माध्यमातून तळागाळातील मुलामुलींसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली. आज शिक्षण संस्थेच्या संकुलात हजारो विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. सहकारक्षेत्र हा भैय्यासाहेबांचा प्रमुख भाग. त्यामुळे सद्गुरु संस्था समुहाच्या नावाखाली असणार्या सर्व संस्था तसेच स्वयंसिद्धामार्फत राबविल्या जाणार्याह सर्व उपक्रमांना त्यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. सहकार महर्षी हणमंतराव पवार कुक्कुटपालन संस्था तोट्यातून बाहेर काढली असून सध्या ती संस्था नफ्यामध्ये आली आहे.
फलटणच्या सांस्कृतिक क्षेत्रात फलटण फेस्टीव्हलचा उपक्रम राबवून वेगळ्या कार्याची चुणूक दाखविली आहे. श्रीराम बझारचे ते व्हाईस चेअरमन असून सदर संस्थेचे कामकाज सुधारण्यास मार्गदर्शन केले जाते. या व अन्य संस्थेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना पाण्याचा टँकर मोफत दिला. माण तालुक्यातील वरकुटे – मलवडी येथे जनावरांसाठी चारा छावणी सुरु करुन मदतीचा हात दिला. आपद्ग्रस्तांना मुलभूत वस्तूचा पुरवठा केला. दुसर्यां चे चांगले गुण हेरण्याची त्यांच्याकडे दृष्टी असल्याने विविध संस्थांची उभारणी करताना उद्योगी व कार्यकुशल माणसे हेरुन त्यांना कामाची संधी दिली. फलटणच्या राजकीय क्षेत्रात नगराध्यक्षपदी असताना इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनाचे काम मार्गी लावले.
सद्गुरु पतसंस्था व महाराजा मल्टीस्टेटच्या माध्यमातून काम करताना त्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे. त्याचप्रमाणे शाखांचे वर्धापनदिनानिमित्त विद्वानांच्या व्याख्यानांचे आयोजन करुन समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न चालू आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर पुरग्रस्तांना मदत आर्थिक व साहित्यरुपाने मदत केली. शहिद जवानांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत केली जाते. साप्ताहिक अंजनद्वारे समाजप्रबोधनाबरोबरच अन्यायाला वाचा फोडण्याचे काम चालू आहे.
महाराष्ट्र राज्य कंझ्युमर्स को ऑपरेटिव्ह फोरमचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन कोरेगाव येथील भाऊसाहेब नलावडे प्रतिष्ठानने सहकारातील उत्कृष्ठ कार्यकर्ता असा गौरव केला तर वाई येथील ज्ञान विज्ञान मंडळाचेवतीने त्यांना गुणगौरव पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
मातापित्यांचे आशिर्वाद, कै.हणमंतराव पवार यांचे उत्तेजन, कर्तृत्त्वाची सावली बनून चालवणारी सहचारिणी अॅड.सौ.मधुबाला भोसले, वडिलांचा समृद्ध वारसा चालविणारे सुपुत्र तेजूदादा आणि रणजितसिंह, गृहीणीपद सांभाळून शैक्षणिक कामात सहकार्य करणार्या, स्नुषा सौ.मृणालीनी, सौ.प्रियदर्शनी यामुळे त्यांचे संसारीक जीवन समृद्ध झाले आहे.
व्यक्तिगत अस्मिता व सामाजिक संदर्भ यामध्ये योग्य तो सुसंवाद साधून राजकीय, सामाजिक, सहकार, सांस्कृतिक क्षेत्राशी संबंध ठेवून भैय्यासाहेबांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. आदरणीय भैय्यासाहेबांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा !
– शब्दांकन : श्री. संदीप जगताप
मुख्य कार्यकारी अधिकारी,
सद्गुरु महाराज उद्योग समूह फलटण










