फलटण – फलटण शहरातील सोमवार पेठ सर्वे नं. ६, गट नंबर 53/54 मधील गेल्या आठ वर्षांपासून वादग्रस्त असलेल्या जागेचा प्रश्न सोडवण्यास लवकरच मार्ग मोकळा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना राजे गटाच्या नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या रहिवाशांना मोठा दिलासा दिला आहे.
नगरपालिका निवडणूक 2025 च्या अनुषंगाने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा प्रभाग क्रमांक एक तील सोमवार पेठ परिसरात प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात नगराध्यक्ष पदाचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, प्रभाग क्रमांक 1 (अ) च्या उमेदवार सौ. लक्ष्मी प्रमोद आवळे आणि प्रभाग 1 (ब) च्या उमेदवार सुमन रमेश पवार यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचा झंझावाती दौरा पार पडला.
यावेळी सोमवार पेठेतील सर्वे नं. ६, गट नं. 53/54 मधील रहिवाशांची बैठक घेऊन संजीवराजेंनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या वादग्रस्त जागेवरील रहिवाशांना कायमस्वरूपी याच ठिकाणी जागा देऊन प्रश्न मार्गी लावू, असा ठोस शब्द त्यांनी दिल्याने तेथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचं समोर येत आहे.
श्रीमंत संजीवराजे यांच्या प्रचार दौऱ्यामुळे सोमवार पेठ मध्ये पुन्हा एकदा शिवसेनेच्या धनुष्यबाणाने वातावरण टाइट केले असून नगराध्यक्ष पदासह प्रभागाच्या उमेदवारांची पक्कड मजबूत झाली असून श्रीमंत अनिकेतराजे ना. निंबाळकर यांना प्रभाग क्रमांक एक मधून मोठे लीड मिळणार असल्याचे तसेच शिवसेना पक्षाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असाही विश्वास शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.









