
फलटण – महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक व राजकीय जीवनातील एक दीपस्तंभ म्हणून अनेकजण श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे पाहतात. लोकशाहीच्या लोकोत्सवातील लोकाभिमुख, लोकमान्य नेतृत्व म्हणून जनसागराच्या साक्षीने त्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय विद्यापीठांचे कुलगुरू असे गौरवाने संबोधले जाते.
जनतेच्या ऋणातून मुक्त व्हावे असे त्यांना कधीच वाटले नाही, कारण हे ऋण म्हणजे पाणी प्रश्न, दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या वेदनांशी जोडलेले ऋण होय. या प्रश्नांच्या कायमस्वरूपी समाधानासाठी त्यांनी आयुष्यभर अटोकाट संघर्ष केला. त्यामुळेच जनतेच्या मनात ते मर्मबंधातली ठेव बनले आहेत.
आज वयाच्या ८० व्या वर्षांकडे वाटचाल करत असतानाही तालुक्यातील प्रत्येक प्रश्नाबाबत ते सतत कार्यरत व कार्यतत्पर दिसतात. आधुनिक विचारसरणी, नव्या तंत्रज्ञानाची जाण आणि बदलत्या काळाशी जुळवून घेणारी दृष्टी हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डीपफेकच्या जमान्यातही टिकून राहणारे, संघर्षातून घडलेले हे असाधारण व्यक्तिमत्त्व आहे.
पाणी संघर्षाच्या माध्यमातून त्यांनी जे अतुलनीय योगदान दिले, त्याचे प्रत्यक्ष दर्शन आज शिवारातील पाणी, कालवे, खळखळून वाहणारे बंधारे पाहताना होते. या विकासामुळे आजची युवा पिढी दुष्काळ पाहिलेला नाही; मात्र त्या पाण्यामागचा संघर्ष इतिहासात कोरला गेला आहे.
सिंहावलोकन केले असता, सातारा जिल्हा तसेच फलटण-लोणंद-खडाळा परिसरातील सामान्य माणूस आणि युवा वर्ग आजही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे मोठ्या विश्वासाने व आशेने पाहताना दिसतो. विचारांशी तडजोड न करता त्यांनी महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नावर दिलेला लढा इतिहासातील महत्त्वाचा अध्याय आहे.
आपल्या वकृत्व व कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी शासनदरबारी प्रभावी आवाज उठवत सातारा जिल्ह्यासह फलटण तालुक्याचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर सुवर्णाक्षरांनी नोंदवले, हे नाकारता येणार नाही.
उर्वरित काळातही फलटण तालुक्याचा कायापालट करण्याचा निर्धार त्यांच्या देहबोलीतून स्पष्टपणे दिसतो. काही मंडळी वैफल्यग्रस्त होऊन आरोप-प्रत्यारोपांची राजकीय मॅरेथॉन चालवत असली, तरी जनतेच्या मनातील नवचैतन्याचा वारा आजही महाराज साहेबांच्या अवतीभोवतीच घोंघावत आहे, हे वास्तव आहे.
म्हणूनच लवकरच फलटण तालुक्यात जनसागराच्या साक्षीने विकासात्मक सहस्त्रचंद्रदर्शनाची परिवर्तनकारी किरणे अधिक ठळकपणे उमटतील, असा विश्वास वाटतो.
माझं सुंदर फलटण…
स्वच्छ फलटण…
मी फलटणकर…!
– श्री. नंदकुमार मोरे











