सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

स्वार्थाच्या जगात : त्यागाचा दीप सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील

On: March 19, 2026 9:55 PM
Follow Us:
---Advertisement---

“जगात माणूस मोठा कशामुळे होतो? संपत्तीमुळे, की त्यागामुळे?”हा प्रश्न आपण स्वतःला विचारला तर उत्तर लगेच मिळत नाही. कारण आजच्या जगात संपत्ती, पद आणि यश यांनाच मोठेपणाचे मोजमाप मानले जाते. पण इतिहास सांगतो की खरे मोठेपण त्यागात, सेवेत आणि माणुसकीत असते.
आजचे जग खूप वेगाने पुढे जात आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि स्पर्धेच्या या युगात प्रत्येक जण स्वतःच्या यशाच्या मागे धावत आहे. पण या धावपळीत अनेकदा माणुसकी मागे पडताना दिसते. स्वार्थाची भिंत उंच होत जाते आणि नात्यांमधील उब कमी होत जाते.स्वार्थाच्या या गर्दीत हरवली माणुसकी सारी,पैशाच्या चमकात फिकी झाली नाती न्यारी.
हृदयात जर प्रेमाचा दिवा पेटला पुन्हा एकदा,तरच उमलेल जगात आपुलकीची फुले सगळीच सारी.
अशा या स्वार्थी वातावरणात काही व्यक्तिमत्त्वे मात्र आपल्या त्यागाने समाजाला उजेड देतात. त्यांचे जीवन म्हणजे प्रेरणेचा दीप असतो. अशाच महान व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील. त्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सहचारिणी आणि रयत शिक्षण चळवळीमागील निःशब्द शक्ती होत्या.
घरची परिस्थिती साधी होती, पण मन मात्र खूप मोठे होते. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी स्वतःच्या दागिन्यांचाही त्याग केला. त्या विद्यार्थ्यांना केवळ मदत करत नव्हत्या, तर त्यांना आईच्या मायेने जपल्या. भुकेल्या मुलांना अन्न, दुःखी मुलांना आधार आणि निराश मुलांना आशा देणारी त्या खऱ्या अर्थाने “माऊली” बनल्या.
दागिन्यांचा त्याग करून पेटवला ज्ञानाचा दिवा,मायेच्या सावलीत वाढला विद्यार्थ्यांचा मेवा.स्वतःचे सुख विसरून जगासाठी जगल्या त्या,
म्हणूनच इतिहास म्हणतो – त्या माऊली महान ठेवा.
आजच्या जगात लोक थोडीशी मदत करतानाही अनेकदा विचार करतात. पण लक्ष्मीबाई पाटील यांनी कधीही “माझे काय?” असा विचार केला नाही. त्यांनी “समाजाचे काय?” हा विचार केला. त्यांच्या त्यागामुळे अनेक गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पसरला.स्वतःसाठी जगणे सोपे, पण अपुरे असते,
इतरांसाठी जगणेच खरे जीवन असते.त्यागाच्या वाटेवर चालणाऱ्यांचेच नाव,इतिहासाच्या पानावर अमर होत असते.
आजच्या पिढीने जर लक्ष्मीबाई पाटील यांच्या जीवनातून प्रेरणा घेतली, तर स्वार्थाच्या जागी सहकार्य, प्रेम आणि माणुसकी वाढेल. कारण त्यांचे जीवन आपल्याला सांगते की खरा आनंद घेण्यात नाही, तर देण्यात आहे.
आणि म्हणूनच शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते- त्याग, माया, सेवा यांचे त्यांनी दिले दान,त्यांच्या जीवनातून मिळते प्रेरणेचे ज्ञान.स्वार्थी जगातही पेटवू या माणुसकीचा दीप,म्हणूनच लक्ष्मीबाई राहतील सदैव महान.


शब्दांकन : प्रा.डॉ.माधुरी सचिन पाटील
जिजामाता ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

error: Content is protected !!