सातारा ( संतोष यादव) – सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकाजवळील यशोदा नगर परिसरात प्राथमिक नागरी सुविधांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून सातारा नगर परिषद प्रशासनाकडून गेल्या अनेक दिवसांपासून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पूर्वी त्रिशंकू भागात समावेश असल्याने या परिसरात सुरुवातीपासूनच लाईट, पाणी, गटार व रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांची कमतरता होती. मात्र नगर परिषद हद्दीत समावेश होऊनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही.
परिसरात सध्या अनेक नवीन इमारतींचे बांधकाम सुरू असल्याने अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू असते. त्यामुळे रस्ते पूर्णपणे खचले असून पाणीपुरवठा गळतीमुळे परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. तसेच जलवाहिनीच्या कामासाठी टाकण्यात आलेली मोठी खडी रस्त्यावर पसरल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
या भागात शैक्षणिक संकुले व रुग्णालये असल्याने शालेय बसेस आणि ॲम्बुलन्सची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जीवितहानी होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात एका नामांकित शिक्षण संस्थेने ८ ते ९ महिन्यांपूर्वी नगर परिषदेकडे निवेदन दिले होते, असेही सांगण्यात आले.
दरम्यान, परिसरातील कमी-जास्त होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत महावितरणकडेही तक्रार करण्यात आली आहे.
सातारा नगर परिषद प्रशासनाने रस्ते व अन्य नागरी सुविधांच्या प्रश्नावर तात्काळ कार्यवाही न केल्यास ‘रस्ता रोको’ आंदोलन छेडण्याचा गंभीर इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
यशोदा नगरमध्ये प्राथमिक सुविधांचा अभाव ; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
By Team LBNN
On: May 6, 2026 2:13 PM







