प्रतिनिधी समाधान बक्षी, छ.संभाजीनगर
छ.संभाजीनगर जिल्ह्यासह परिसरात मागील दोन-चार दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अनेक भागांत पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पावसाच्या उघडीपामुळे खरीप हंगामातील पिकांवर परिणाम होऊ लागला असून, दुबार पेरणीची भीती शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.
वैजापूर तालुक्यातील मनूर, पोखरी, साकेगाव, साळेगाव, सासेगाव, खिर्डी, मालेगाव, गारज, बाभुळगाव आदी गावांमध्ये मागील आठवड्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पेरणी केलेली पिके करपू लागल्याची स्थिती आहे.
दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या रिमझिम पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी कापूस, बाजरी तसेच इतर खरीप पिकांची पेरणी केली होती. मात्र, त्यानंतर पावसाने अचानक उघडीप दिल्याने पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी उगवण धोक्यात आली आहे. परिणामी, दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.
आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा बियाणे, खते आणि मशागतीसाठी अतिरिक्त खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला असून, शासनाने तातडीने परिस्थितीची दखल घेऊन आवश्यक मदत करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
अचानक गायब झालेल्या पावसाने शेतकरी चिंतेत; दुबार पेरणीचे संकट
By Team LBNN
On: July 13, 2026 10:30 AM







