फलटण : समतेचा आग्रह धरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध कायदे, हक्क व अधिकारांच्या माध्यमातून दलित, पीडित, वंचित, उपेक्षित, आदिवासी, भटके-विमुक्त तसेच गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या समूहांना आणि तमाम स्त्रीवर्गाला भारतीय विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना नवा चेहरा प्राप्त करून दिला, असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांनी केले.
ता. फलटण येथील भिलकटी येथे “जय भीम तरुण मंडळ” आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक राजकुमार कांबळे होते.
यावेळी प्रा. शांताराम काळे, पत्रकार मुकुटराव कदम आणि सुशांत घनवट यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. डॉ. प्रभाकर पवार पुढे म्हणाले की, डॉ. आंबेडकरांनी भारत देशावर आजन्म प्रेम केले. ते निष्ठावंत मातृभक्त आणि देशप्रेमी होते. हजारो वर्षे विविध प्रकारच्या गुलामीत खितपत पडलेल्या समाजाला त्यांनी माणूस म्हणून जगण्याचे हक्क दिले. तसेच हक्क आणि अधिकारांसाठी लढण्याची प्रेरणाही दिली.
स्त्रियांच्या सन्मानासाठी त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून शिक्षण, मताधिकार, पदाधिकार, वारसाहक्क, घटस्फोट आणि सन्मानाने जगण्याचा संविधानिक अधिकार दिला. त्यामुळे स्त्रियांना सामाजिक आणि कौटुंबिक स्तरावर माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त झाला, असेही त्यांनी सांगितले.
“डॉ. आंबेडकरांचे कार्य कोणत्याही स्वातंत्र्य लढ्याइतकेच मोठे होते. मानवी स्वातंत्र्य आणि मानवमुक्तीसाठी लढणारा सर्वोत्तम योद्धा म्हणून त्यांची जगभरात ओळख आहे. भारतीयांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करून देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे,” असे आवाहनही त्यांनी केले.
ज्येष्ठ पत्रकार मुकुटराव कदम यांनी “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा स्वीकार करून तरुणांनी प्रगतीसह समाजविकासाला प्राधान्य द्यावे, असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात राजकुमार कांबळे यांनी भारतीय समाजाने डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक व आर्थिक विचारांचा अभ्यास करून व्यवसायनिष्ठ आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. शांताराम काळे यांनी केले. कार्यक्रमास ग्रामस्थ, महिला, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.







