फलटण – पेशवाईच्या अस्तानंतर १९ व्या शतकात भारतात आधुनिक विचार व समाजसुधारणेचे वारे वाहू लागले. हा प्रबोधनाचा पूर्वरंग होता. याच काळात शिक्षण, ज्ञान आणि स्त्री-पुरुष समानतेचा नारा देत क्रांतिबा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक सुधारणेची व आधुनिक जीवनप्रणालीची हाक दिली. अंधश्रद्धा व दांभिक वृत्तीला त्यांनी कडवे आव्हान देत मुलींच्या शाळा सुरू करून शूद्रातिशूद्र बहुजन समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढण्याचा कृतीकार्यक्रम राबविला. त्यामुळे क्रांतिबा फुले हेच भारतीय समाजसुधारणेचे अग्रदूत ठरतात, असे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांनी केले.
मुधोजी महाविद्यालयात आयोजित विशेष सप्ताहातील प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सौ. सरिता माने होत्या. प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संयोजक प्रा. डॉ. नवनाथ रासकर, प्रा. डॉ. अनिल टिके, प्रा. डॉ. अशोक शिंदे, प्रा. डॉ. टी. पी. शिंदे आदी उपस्थित होते.
“भारतीय समाजक्रांतीचे अग्रदूत : क्रांतिबा फुले” या विषयावर व्याख्यान देताना प्रा. डॉ. प्रभाकर पवार पुढे म्हणाले की, क्रांतिबा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या ‘मानवी अधिकार’ या ग्रंथाचा प्रभाव होता. स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्यायाची जाणीव झाल्यानंतर त्यांनी शिक्षणप्रसार व समाजसुधारणेवर भर दिला. मुला-मुलींच्या शाळा चालवून त्यांनी जीर्ण प्रथांविरोधात आंदोलने केली तसेच परिवर्तनवादी लेखनाद्वारे समाजप्रबोधन घडवून आणले.
सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी सार्वजनिक सत्यधर्माचा आग्रह धरला. त्यांच्या विचारांचा प्रभाव इतका व्यापक होता की त्यातून हजारो कार्यकर्ते तयार झाले. राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा तसेच श्रीमंत मालोजीराजे यांनीही हा विचार विविध उपक्रमांद्वारे समाजात रुजविला. त्यामुळे शिक्षण, समाजसुधारणा व शेतकरीहिताला बळ मिळाले.
आधुनिक विचारसरणी, धर्मनिरपेक्षता आणि विज्ञानवादाला गती मिळण्यामागे फुले दांपत्याचे मानवतावादी कार्य महत्त्वाचे ठरले. आजच्या समाजाने क्रांतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारक कार्याचा वसा घेऊन भारतीय समाजव्यवस्था अधिक मजबूत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात प्रा. डॉ. सौ. सरिता माने म्हणाल्या की, भारताला समाजसुधारणेची नितांत गरज असताना क्रांतिबा फुले यांनी शिक्षण व ज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. स्त्रियांच्या विकासासाठी त्यांनी अज्ञान, अंधश्रद्धा, कर्जबाजारीपणा, भोंदूगिरी व बुवाबाजीविरोधात सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून मोठे कार्य केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. नवनाथ रासकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अंकुश खोब्रागडे यांनी केले.
क्रांतिबा ज्योतिबा फुले हे भारतीय समाज सुधारण्याचे अग्रदूत – प्रा. डॉ. प्रभाकर पवार
By Team LBNN
On: May 10, 2026 11:56 AM








