सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

मासिक पाळी: ‘ती आणि तो’च्या नजरेतून

On: May 22, 2026 10:20 AM
Follow Us:

    ती, तो, स्त्री, पुरुष असा भेद जेव्हा एक मानव या दृष्टिपल्याड जातो ना तेव्हाच त्या माणसाच्या माणुसकीचा खरा दृष्टिकोन समोर येतो. बघा ना, जिथे सृष्टी बनवणाऱ्या नर देवाला देवता/माता या नारीसोबत अगदी मनोभावे पुजले जाते तिथे ती/स्त्री नि तो/पुरुष यांच्यात किती मोठे अंतर आहे हे वेळोवेळी छोट्या-छोट्या वर्तनातून दाखवून दिले जाते. सृष्टिकर्त्याने शरीररचना वेगवेगळी दिली असली तरी रक्तात भेद पाळला नाही मग ज्या मानवांद्वारे सृष्टी पुढे नेली जातेय त्यांच्याकडूनच एकमेकांशी इतका भेदभाव का ? ज्या गर्भातून जीव जन्माला येतो त्याच गर्भातून स्रवणाऱ्या ‘लाल’ रंगाला गालबोट का ? जिला प्रत्येक क्षेत्रात स्वातंत्र्य तिची एक नैसर्गिक बाब आजही ‘काळ्या पिशवीत’ बंद का ? नको त्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्यांना मासिक पाळीसारखी साधी गोष्ट का बरे रुचत नाही ? एक वैचारिक, शिक्षित आणि समाजशील व्यक्ती म्हणून लिंग व शरीररचना यांत भेद माहिती असून नैसर्गिकतेला नियमबद्ध करणे नपुंसकतेचं लक्षण नव्हे का ?

या नि अशा प्रश्नांना जेव्हा वाचा फुटते तेव्हा विविधतेने नटलेल्या पृथ्वी नावाच्या ग्रहावर मासिक पाळी ही अशी गोष्ट आहे जी कुठल्याही धर्माच्या बाबतीत साम्य दर्शवणारी असून माणूस उद्या कोणत्याही ग्रहावर जाऊन पोहचला तरीही त्याच्या मानसिक दृष्टिकोनात होणारा बदलाव पचणे इतक्या सहज शक्य नाही. याच आशयाचा बोलबाला समाजातल्या प्रथा, रूढी यांतून जणू दिसून येतो.

ज्या स्त्रीच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा आदर करून तिला सन्मान, प्रतिष्ठा द्यायला हवी त्याच स्त्रीच्या रक्तस्रावाचा मात्र पावलोपावली तिरस्कार, भेदभाव, हिंसाचार नि छेडछाड होताना दिसते. जिच्या ‘लाल’ म्हणवल्या जाणाऱ्या रक्तापासून मग मुलगा असो की मुलगी यांचा जन्म होतो तिच्याच मासिक पाळीला ‘लाल धब्बा’ संबोधताना मानसिकतेची जाणता किती भयानक स्थराला जाऊन ठेपली आहे याची जाण होते. जिचं अस्तित्व मुलाबाळांच्या नावानं सुप्रसिद्ध तिच्या अवघडलेल्या दृश्य दुःखाची मात्र केवढी विटंबना !

मासिक पाळीत स्वच्छतेची काळजी घेणे जणू नवजात शिशुसमान महत्वाचे असते. मात्र एकीकडे सॅनिटरी पॅडचा वापर होत असताना नैसर्गिक बाबीला व्याधी म्हणून कापडाचा वापर हाच धर्म तसेच उपाय मानणारी विदारक बाजू असणे, हे हास्यास्पद आहे. पाळीवेळी महिलेला देवघरात प्रवेश नाहीच शिवाय तिचा घरातला वावर कमी करून तिच्यासोबत काहीतरी वेगळं घडत असण्याची सतत जाणीव करून देणे म्हणजे तिच्या मूलभूत अधिकारांची पायमल्लीच झाली. ज्या पाळीला ‘मासिक धर्म’ म्हणून संबोधले जाते तिची अवहेलना धार्मिक म्हणवले जाणारे लोक तर करताच शिवाय शिक्षित वर्गही यात मागे नाही, ही कटू सत्यता. याची उघड बतावणी अलीकडील उदाहरण म्हणजे केरळसारख्या महिला साक्षरता दर सर्वाधिक असणाऱ्या राज्यात मासिक पाळी येणाऱ्या स्त्री गटाला शबरीमाला मंदिरात प्रवेश नाकारला जाणे यातून झाली खरी परंतु दृष्टिकोन, समाजभान, स्त्री-शत्रुत्व, स्त्रीची स्त्रीविषयीची संवेदना इत्यादींवरचे प्रश्नचित्र मात्र अनुत्तरीतच राहिले.

जिथे ‘ती’ चं स्त्रीत्व कौमार्य चाचणीसारख्या क्रूर प्रथांआड आजही झाकलेले आहे तिथे ‘तो’ म्हणजे पुरुष या पडद्यातून डोकावणे तर दुरापास्त ! परंतु आजची एकविसाव्या शतकातली तरुणपिढी यावर खुल्या, मनमोकळ्या स्वरात व्यक्त होत आहे. एक मैत्रीण, आई, बहीण, साथीदार या नात्याने हा तरुण म्हणजे आजचा ‘तो’ समजूतदारपणा दाखवत ‘ती’ च्या भावना समजून घेत आहे. शारीरिक दुःख, वेदना, ताणतणाव, चिडचिड, स्वभावातला चढउतार अशा भावना वाटता येत नसल्या तरी मानसिक आधार, भावनिक साथ, मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या आसपासच्या ‘ती’च्या प्रश्नांकडे हा तरुण सजगता म्हणून पाहत आहे. मासिक पाळी मासिक धर्म म्हणून न पाळता तिच्या नि सोबत स्वतःच्या आयुष्याचा एक नैसर्गिक भाग समजत आहे. समाज नावाच्या घटकाला महत्व देताना तो समाजात राहून याच समाजाच्या पुरुषी मनात अहिंसक-शाब्दिक मार्गाने स्त्रीत्वाची जाणीव रुजवत आहे. अनेक तरुण कवी/लेखक/साहित्यिक मासिक पाळीच्या अंधश्रद्धांना लेखणीच्या जोरावर पेलत आहेत. मर्यादा ओलांडायचीच तर मग समाजातल्या अजाणतेपणे होणाऱ्या अन्यायांविरोधात का नाही ही पुरुषांच्या विचारातली दृष्टी प्रशंसनीय आहे. सोबतच एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीसाठी आवाज उठवणं गरजेचं आहे, हेही काही अंशी पटवून दिलं जात आहे. 

हे वरवर सकारात्मक भासणारं चित्र मनात घर करत असताना मोठमोठ्या मॉल्समध्ये शानशौकत म्हणून उघडपणे रचलेल्या सॅनिटरी पॅड्सच्या ढिगाऱ्याकडे पाहिले की वाटून जाते की खरंच मासिक पाळी नैसर्गिक आहे. पण त्याचवेळी घरोघरी टेलिव्हिजनवर चालणाऱ्या जाहिराती जेव्हा पुरुषांकडून महिलांसमोर आणि महिलांकडून पुरुषांसमोर बदलल्या जातात तेव्हा विचारातली व प्रत्यक्ष कृतीतली खरी दरी समजते. काळ्या पिशवीत गुंडाळलेल्या या व्याधी म्हणवल्या जाणाऱ्या पाळीला ही अशी अमानसिकता पिढयानपिढया आपसूक गुंडाळली गेलेली आहे. रूढीवादी परंपरा हे सगळं समाजात रुजवतात असं म्हणावं तर पुरातनकाळी ‘स्त्री योनी पुजणाऱ्या पवित्र परंपरेला’ बघता अशा लोकांची वागणुक बुद्धीहीनता म्हणावी की उर्मटपणे केलेला आंधळेपणा हेच मुळात दुर्दैव आहे. यामुळेच अशा बुरसटलेल्या विचारांना तोंड देताना बदलाव स्वीकारू पाहणाऱ्या तरुणांचा स्वर हवी तितकी झेप घेताना दिसत नाही.

म्हणूनच सोशल मीडियासारख्या माध्यमांतून, मित्र-मैत्रिणींच्या गप्पाटप्पातून हे तरुण जितक्या तीव्रतेने व्यक्त होताना दिसतात त्याच तरुणांच्या घरात आई, बहीण, बायको, आजी यांची मासिक पाळी, तिची तारीख, तिचा मानसिक ताण, होणारा त्रास, त्यावरचा उपाय, स्वच्छतेचा प्रश्न इत्यादी बाबतीत होणारी कुजबुज मासिक पाळीपेक्षा अधिक नैसर्गिक की काय अशी शंका निर्माण होते. त्यामुळे जेव्हा घरातला आधार असलेला ‘तो’ बदलेल तेव्हाच बाहेरचे जग बदलायला कुठेतरी सुरुवात होईल. शरीराच्या अंगांचा आदर राखणे इतके अवघड जात असेल तिथे संपूर्ण शरीराची अवहेलना होणे अगदीच शुल्लक म्हणावे लागेल. तिच्या मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवणे चुकीचे असे नसून ही तिच्या शरीराची निकड आहे हे योग्य कारण समाजमनापर्यंत पोहचले पाहिजे. तिच्या शारीरिक बाबींकडे ‘तो’ जेव्हा समस्या म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून बघेल तेव्हा खऱ्या अर्थाने ‘ती आणि तिची मासिक पाळी’ समाज म्हणवल्या जाणाऱ्या चौकटमय बंदिस्त नजरेतून बाहेर पडून मोकळा श्वास घेईल.

एकूणच जेव्हा स्त्रीच्या आसपासचा ‘तो’ खऱ्या अर्थाने साक्षर होईल तेव्हा तिच्या वेदनांचा भार हलका होईल. पाळीसारख्या नैसर्गिक गोष्टीचा उगाच केला जाणारा बाऊ समाजातून मुळासकट नष्ट होण्यास मदत होईल. पुरुषप्रधान संस्कृतीच्या विळख्यात दडलेल्या प्रथांची भीषण मानसिकता समोर येऊन एक माणूस म्हणून एकमेकांकडे बघण्याची दृष्टी मिळू शकेल. पाळीसारखा नैसर्गिक प्रक्रियांनी स्त्रीचे स्त्रीत्व राखले जाते याची दखल घेणे आज महत्वाचे आहे. नाहीतर तिच्या पावित्र्याच्या आणखी किती अग्निपरीक्षा घेतल्या जातील हे सांगणे फार कठीण होईल. सोबतच स्त्रीने स्त्रीची बाजू मांडताना पुरुषी अहंकाराला ठेच पोहचते आहे का यापेक्षा एक निरपेक्ष व्यक्ती म्हणून पुरुषी अहंकार व स्त्रीच्या स्वाभिमानाकडे बघणे योग्य ठरेल. म्हणजे लिखित अधिकारांच्या न्यायासाठी प्रत्येकवेळी कोर्टाच्या दारात खेट्या न घालता एकमेकांच्या मानसिक भावना संपूर्ण समाजाला समजून घेता येतील.

जसं ‘ती’चं स्त्रीत्व मासिक पाळीसारख्या बाबीतून सिद्ध होतं तसं त्याचं पुरुषत्व तिच्यावरच्या शारीरिक हिस्स्यापर्यंतच मर्यादित नाही याचे शिक्षण पालकांनी आपल्या पाल्याला योग्य वेळी देणे हा नैसर्गिकतेला व्याधी मानणाऱ्या विचारांवर एक उपाय ठरू शकतो. प्रत्येक स्त्रीला होणारा त्रास वेगवेगळा असल्यामुळे एकाच तराजूतून पाळीला तोलले जाणार नाही याची खबरदारी घेणंही तितकंच महत्वाचं आहे. सध्याच्या शॉर्ट फिल्म्सच्या कथांतून ‘सुपरकुल डॅड’, ‘सुपरकुल पार्टनर’ हळूहळू समोर येत आहेत. ही सकारात्मक बाब जितक्या लवकर समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत जाईल तितक्या लवकर ‘ती, तो आणि मासिक पाळी’ ही वरवर समाधान देणारी, फक्त बरोबरीची वाटणारी सकारात्मकता एक मानसिकता म्हणून प्रत्येकात रुजली जाऊ शकेल. आणि असे होण्यासाठी वागणे-बोलणे यात भेद दिसता कामा नये. म्हणूनच उद्याचे भविष्य समजल्या जाणाऱ्या तरुण पिढीने आपली जबाबदारी समजून मासिक पाळीसारख्या स्त्री-पुरुष यांच्या जगण्यावर मर्यादा आणणाऱ्या बाबीकडे बदल घडवण्याच्या मार्गाने अधिक वैचारिकदृष्ट्या बघण्याची गरज आहे. स्त्रीच्या आतापर्यंतच्या अमानुष व्यवहाराला ‘ती’ आणि ‘तो’ च्या नजरेतून बघताना तिला अमाणुसकीत अडकलेल्या विडंबनेच्या चौकटीबाहेर आणण्यासाठी सुदृढ विचारांचा पुढाकार आज गरजेचा आहे.

©️ वर्षा शिदोरे
नाशिक
मो. नं. ८७९३७९९७७७

हे ही वाचा  भगवान महावीर जयंती: त्याग, तपस्या आणि सत्याच्या मार्गाची प्रेरणादायी गाथा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!