फलटण शहरात १ मेपासून डिजिटल जनगणनेला सुरुवात; मोबाईल अॅपद्वारे होणार माहिती संकलन
फलटण – फलटण शहरात केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १६ व्या जनगणनेच्या प्रक्रियेला १ मे २०२६ पासून प्रारंभ होत आहे. यंदाची जनगणना विशेष ठरणार असून, प्रशासनामार्फत प्रथमच संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने मोबाईल अॅपच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखील जाधव यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिली.
भारत सरकारचे महा. रजिस्ट्रार तसेच महाराष्ट्र शासनाच्या जनगणना संचालनालयाच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जनगणनेद्वारे गोळा होणारी सामाजिक, आर्थिक व लोकसंख्याशास्त्रीय माहिती भविष्यातील विकास आराखडे तयार करण्यासाठी आणि संसाधनांचे योग्य नियोजन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
ही जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घर यादीकरण व घरगणनेचे काम केले जाणार आहे. मात्र त्याआधी १ ते १५ मे दरम्यान नागरिकांना census.gov.in या संकेतस्थळावर “स्व-गणना” (Self-enumeration) करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेद्वारे नागरिक स्वतःच्या घराची स्थिती, उपलब्ध सुविधा तसेच मालमत्तेची माहिती ऑनलाईन भरू शकतात.
यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रगणक प्रत्यक्ष घरांना भेट देऊन माहितीची पडताळणी व संकलन करतील. शहरातील १३ प्रभागांमध्ये ही प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी एकूण ९६ प्रगणक गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक गटामध्ये साधारण १८० ते २०० घरे व ७०० ते ८०० लोकसंख्येचा समावेश आहे. या कामासाठी ९२ प्रगणक व १८ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना ५ ते ७ मे दरम्यान विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
जनगणना पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला एक स्वतंत्र ओळख क्रमांक प्रदान केला जाणार आहे. भविष्यातील विविध शासकीय कामांसाठी हा क्रमांक महत्त्वाचा ठरणार असल्याने तो जतन करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रक्रियेदरम्यान प्रत्येक नागरिकास सुमारे ३३ प्रश्न विचारले जाणार आहेत.
ही जनगणना केवळ आकडेवारी गोळा करण्यापुरती मर्यादित नसून राज्याच्या विकासाचा भक्कम पाया आहे. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता नागरिकांनी अचूक व प्रामाणिक माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी निखील जाधव यांनी केले आहे.
१ ते १५ मे ‘स्व-गणना’ सुविधा; नागरिकांना अचूक माहिती देण्याचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांचे आवाहन
By Team LBNN
On: April 30, 2026 6:04 PM







