लेखनाची जादू करणारे अनेक लेखक, कवी, पत्रकार आणि साहित्यिक आपल्या समाजात आहेत. त्यांच्या लेखणीने अनेक वाचकांना भुरळ घातलेली असते. विशेष म्हणजे, हे केवळ लेखन नसते, तर त्या लेखनातून समाजाचे प्रतिबिंब उमटताना दिसते.
आज अनेक ज्येष्ठ लेखकांसोबतच नवतरुण पत्रकारही आपल्या लेखणीच्या माध्यमातून वाचकांवर प्रभाव टाकणारे लेखन करीत आहेत. सामाजिक जाणीव जागृत ठेवून, जागृतीची ज्योत तेवत ठेवत समाजाला दिशा देणारा असाच एक नवतरुण कवी, लेखक आणि पत्रकार म्हणजे सुशिल गायकवाड.
त्यांच्या सु‘शिल’ लेखनातून उत्तम विचार, सदाचार, नीतिमूल्ये आणि सकारात्मक सामाजिक संस्कार वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने होत आहे. त्यांच्या लेखणीत निर्भीडपणा दिसून येतो आणि वास्तवाची मांडणी हा त्यांच्या लेखनाचा महत्त्वाचा पैलू आहे.
हा नवतरुण लेखनकर्ता अगदी आपल्या नावाप्रमाणेच कार्य करताना दिसतो. शेक्सपियरने ‘नावात काय आहे?’ असा प्रश्न उपस्थित केला असला, तरी काही व्यक्तींच्या बाबतीत त्यांच्या नावातच त्यांच्या कार्याची ओळख दडलेली असते, असे जाणवते. स्वतःच्या नावातील अर्थ आपल्या कार्यातून आणि लेखनातून प्रत्यक्षात उतरविणाऱ्या व्यक्तींमध्ये सुशिल गायकवाड यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
स्वतःच्या प्रसिद्धीपेक्षा इतरांना प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे. आपण केलेल्या कार्याची इतरांनी दखल घ्यावी किंवा घेऊ नये, याची पर्वा न करता आपल्या कामाची पद्धत आणि सामाजिक बांधिलकी त्यांनी कायम जपली आहे. लेखन करत राहणे आणि समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना प्रकाशझोतात आणणे, हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे.
लेखनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक विषय हाताळले आहेत. विशेषतः शैक्षणिक विषय हा त्यांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. विविध शाळांचे शैक्षणिक कार्य, नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता यावर त्यांनी सातत्याने लेखन केले आहे.
‘मुलं ही केवळ गुण मिळविण्याची मशीन नाहीत’, ही भूमिका त्यांच्या लेखनातून ठामपणे मांडली जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व देणारी त्यांची भूमिका निश्चितच विचार करायला लावणारी आहे.
पुस्तकवाचनाची आवड असलेली ही व्यक्ती विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून इतरांमध्येही वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करते. विद्यार्थ्यांविषयी विशेष जिव्हाळा असल्याने विविध समाजसुधारकांची पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ते करीत असतात. संविधानिक मूल्यांची मांडणी केवळ लेखणीतून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो.
नैतिक मूल्ये, चांगले विचार आणि समाजाला योग्य दिशा देणाऱ्या भाषेचा वापर त्यांच्या लेखनात आढळतो. कवी, लेखक आणि पत्रकार या नात्याने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची जबाबदारी निःस्वार्थी, निर्भीड, निष्कलंक आणि पारदर्शकपणे पार पाडत सामाजिक बांधिलकी जपण्याचा ते सातत्याने प्रयत्न करतात.
समाजातील शोषित, वंचित आणि पीडित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी सत्य परिस्थिती मांडण्याचे कार्य त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून केले आहे. आपल्या सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर वास्तविक माहिती अचूकपणे लोकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रेरणादायी कार्य त्यांच्या परखड आणि टोकदार लेखणीतून होत आले आहे.
सामान्य जनतेवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराला वाचा फोडणे आणि सर्वसामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविणे, हे पत्रकारितेतील त्यांचे महत्त्वाचे योगदान म्हणावे लागेल. पत्रकारिता करताना जात-पात, धर्म किंवा कोणत्याही प्रकारचा भेद मनात न ठेवता लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आणि जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी ते सातत्याने कार्यरत असतात.
सातारा जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रातील विविध भागांतील सामाजिक प्रबोधन घडवून आणणाऱ्या विषयांवरही त्यांनी लेखणी चालवली आहे. समाजातील सकारात्मक कार्य, परिवर्तनवादी विचार आणि जनहिताचे प्रश्न लोकांसमोर आणण्याचा त्यांचा प्रयत्न कायम राहिला आहे.
नामांकित, निःस्वार्थी, निर्भीड, निष्कलंक, निष्पक्ष, कर्तव्यदक्ष, स्वाभिमानी आणि अभ्यासूवृत्ती असलेले कवी, लेखक आणि पत्रकार सुशिल गायकवाड यांच्या ‘सु‘शिल’ लेखनाचा’ निश्चितच समाजातील विविध घटकांना अभिमान वाटतो.
आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आणि त्यांना बळ देण्याचे प्रेरणादायी कार्य त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या लेखणीला आणि त्यांच्या निर्भीड शब्दांना मनापासून सलाम करावासा वाटतो.
— लेखन :
राजेंद्र खुंटे
(सामाजिक कार्यकर्ते)
सु‘शिल’ लेखनाचा वाचकांवर प्रभाव
By Team LBNN
On: August 28, 2026 8:36 PM









