फलटण – फलटण शहरात पोलीस निरीक्षक अरविंद काळे व पोलीस उपविभागीय अधिकारी श्री विशाल खांबे यांच्या कार्यकाळात अवैध धंद्यांवर कोणताही लगाम लागत नसल्याने चिरकुट गुंड वाढले. सर्वसामान्य नागरिकांना त्रासदायक होत असलेल्या आणि खुल्यामपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासनाला माहिती देऊनही कारवाई होत नाही. त्यामुळे अशा अवैध धंद्यात गुन्हेगारांना बळ मिळत आहे त्यामुळे असे चिरकुट गुंड गल्लीबोळात तयार होतात आणि नंतर त्यांचं गुन्हेगारी संघटन तयार होऊन सर्वसामान्यांना दहशतीला सामोरं जावं लागत आहे कालचाच प्रकार पाहिला तर फलटण शहराला लाभलेला शांततेचा आणि सांस्कृतिक लौकिक काल रात्री शंकर मार्केटमध्ये झालेल्या रक्तरंजित थराराने धुळीस मिळवला आहे. १०-१२ जणांच्या टोळक्याने उघड्या तलवारी आणि शस्त्रांनी दहशत माजवत दोन निष्पाप भावांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आज फलटणमध्ये उमटले.
“हातात शस्त्रे घेऊन दहशत माजवणाऱ्या त्या फटकुळ दादांची जुन्या गावठाणातून आणि शहरातून धिंड काढा,” अशी आक्रमक मागणी आज सर्वपक्षीय नेत्यांनी आणि विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
पोलिसांना अल्टिमेटम; ‘मोक्का’ लावा अन्यथा ‘फलटण बंद’ ठेवू!
शंकर मार्केट येथे गॅरेज चालवून उदरनिर्वाह करणारे श्री. अनिल विठ्ठल हिरणवाळे आणि श्री. संतोष हिरणवाळे यांच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज सकाळी सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि शहरातील विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांना एक सविस्तर ‘जाहीर निवेदन’ दिले.
“हा हल्ला केवळ एका व्यवसायावर नसून तो फलटणच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर झालेला हल्ला आहे. गुन्हेगारांवर तात्काळ ‘खुनाचा प्रयत्न’ आणि ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करावी. तपास संथ गतीने झाल्यास किंवा आरोपींना पाठीशी घातल्यास संपूर्ण ‘फलटण शहर बंद’ ठेवून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल,” असा थेट इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केलेला तीव्र संताप:
“आम्ही तिथे असतो तर त्यांना नुसते पाठवले नसते…” : “काल जो प्रकार घडला आहे त्या आरोपींना तत्काळ अटक करून त्यांची जुन्या गावठाणामधून धिंड काढण्यात यावी. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस पावले उचलावीत. त्या पोरांचे नशीब आहे की काल आम्ही त्या ठिकाणी नव्हतो. जर आम्ही तिथे असतो, तर आज ही परिस्थिती राहिली नसती, आम्ही त्यांना परत नुसते पाठवले नसते.” – अझरुद्दीन ऊर्फ पप्पूभाई शेख (नगरसेवक)
“शहरातील सर्व अवैध धंदे तातडीने बंद करा” :
“या भयंकर प्रकाराची तात्काळ दखल घेत पोलिसांनी शहरामध्ये सुरू असणारे सर्व अवैध व्यवसाय तातडीने बंद करा. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत असून आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी.” – अनुप शहा (माजी विरोधी पक्ष नेते, फलटण नगरपरिषद)
“पोलीस गुन्हेगारांना सामील असल्याचा संशय” :
“शहरात जे अवैध प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत, त्याची पोलिसांना पूर्ण माहिती असून पोलीसच यात सामील असल्याचा मोठा संशय आहे. फलटणला आता दोन नव्या पोलीस इमारती मिळाल्या आहेत. त्या इमारतींमधून पोलिसांनी गुंडांना अटकाव करण्याचे काम करावे.” – अमोल सस्ते (युवा नेते)
“गुंडांची धिंड काढा” :
“काल शंकर मार्केट येथे घडलेल्या प्रकाराची दखल घेत पोलिसांनी तात्काळ गुन्हेगारांना अटक करावी आणि त्यांची जुन्या गावठाणामधून धिंड काढावी.” – जगन्नाथ ऊर्फ भाऊसाहेब कापसे (जेष्ठ नेते)
सर्वसामान्यांमध्ये पोलीस प्रशासनावर उघडपणे नाराजी व्यक्त होत असून पोलिसांवरच थेट आरोप होत आहे – अवैध धंद्यांना खतपाणी मिळत असल्याने पीआय अरविंद काळे आणि डीवायएसपी विशाल खांबे यांच्या कार्यकाळात चिरकूट गुंडांची दहशत वाढली!!









