फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा वर्धापन दिन तथा ८० वा स्वातंत्र्य दिन विविध देशभक्तीपर व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंत मुधोजीराजे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष अशोक जीवराज दोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणाची ऑर्डर क्रीडा शिक्षक तुषार मोहिते यांनी दिली.
यावेळी वंदे मातरम्, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व झेंडा गीताचे गायन विनिता लोणकर, नेरकर सर, आर्या साळुंखे यांच्यासह विद्यार्थिनींनी सादर केले. मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या एनसीसी विभागप्रमुख डी. जे. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी कॅडेट्सनी शपथ घेत संचलन केले. सी. क्यू. एम. एस. रुद्र तांबे यांच्या नेतृत्वाखाली सार्जंट मृणालिनी घोरपडे व ऑल इंडिया कॅम्प मास्टर्स विनर श्रवण चव्हाण यांच्यासह कॅडेट्सनी संचलनात सहभाग घेतला.
यावेळी इयत्ता दहावी तसेच बारावीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये जानवी लांडगे, सई शिंदे, वेदांतिका कणसे-पाटील व श्रेया कदम यांचा गौरव करण्यात आला.
बारावी कला शाखेत यशराज मदने, अंजली कदम व सई चव्हाण; वाणिज्य शाखेत अश्विनी नेवसे, प्रणिता कांबळे व पूनम कचरे; तर विज्ञान शाखेत सिद्धांत साळुंखे, सई सुर्वे व संस्कृती फरांदे यांचा सत्कार करण्यात आला.
याशिवाय इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतील आध्या केदार खिलारे, प्रगती बनकर व स्वरा हरिहर, तसेच शाळाबाह्य शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा (एमटीएस) मध्ये राज्यात सातवा क्रमांक मिळविणारा सुयश दोशी यांचाही सन्मान करण्यात आला. फलटण नगरपरिषद व फलटण नगरपरिषद शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविणाऱ्या स्वरांजली अमोल नाळे हिचाही गौरव करण्यात आला.
इयत्ता आठवीतील विद्यार्थी वीर दोशी याने स्वतः काढलेले महात्मा गांधी यांचे चित्र कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अशोक जीवराज दोशी यांना भेट म्हणून दिले.
क्रीडा शिक्षक तुषार मोहिते यांच्या संकल्पनेतून इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या तालावर सामूहिक कवायत व संचलन सादर केले. या सादरीकरणामुळे परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून गेला. या कार्यक्रमासाठी भारत बोराटे, गणेश पाटील, लोकरे मॅडम व राजपुरे मॅडम यांनी सहाय्यक मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली.
कार्यक्रमास फलटण एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे ट्रेझरर हेमंत रानडे, नियामक मंडळाचे सदस्य शिरीषशेठ दोशी, रणजित निंबाळकर, भोजराज नाईक निंबाळकर, संजय भोसले, नितीन गांधी, वसुंधरा नाईक निंबाळकर, बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या उषादेवी भोसले, चंद्रकांत पाटील, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, शाळा तपासणीस दिलीप राजगुडा, सुधीर अहिवळे, माजी सहाय्यक क्रीडा प्रशिक्षक बी. बी. खुरांगे, प्राचार्य वसंत कृष्णा शेडग, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य सोमनाथ माने, माध्यमिकचे उपप्राचार्य आण्णासाहेब ननवरे, पर्यवेक्षक आर. बी. निंबाळकर, विजय पाटील, पूजा पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित जमदाडे व संजय गोफणे यांनी केले.
मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन रंगारंग कार्यक्रमांनी उत्साहात साजरा
By Team LBNN
On: August 17, 2026 7:07 AM









