फलटण – ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिनी ‘ज्ञानदान’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन
ज्ञान, शिक्षण आणि परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ २०२५ च्या वतीने एक अर्थपूर्ण व अनुकरणीय उपक्रम राबविण्यात आला. समाजातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यास दिशा देण्याच्या हेतूने पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व अभ्यासपुस्तके डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेस संच स्वरूपात प्रदान करण्यात आली.
या उपक्रमामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळणार असून, शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम पिढी घडविण्याच्या विचारांना बळ मिळाले आहे. यावेळी अभ्यासिकेतील ग्रंथपाल मॅडम यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करत जयंती मंडळातील सर्व सदस्यांचे मनापासून आभार व्यक्त केले. तसेच सामाजिक जाणीव जपत शिक्षणकेंद्री उपक्रम राबविणे ही काळाची गरज असून, अशा उपक्रमांचा आदर्श इतर जयंती मंडळांनीही घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.












