फलटण : फलटण शहरातील नागेश्वर मंडई परिसरात काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत भाजी विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या दुर्घटनेदरम्यान अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचताना रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे अडथळे निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले होते.
लाटकर व्यासपीठ आणि नागेश्वर मंडई परिसरात भाजी, फळ विक्रेते तसेच इतर व्यावसायिकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणी येत होत्या. आपत्कालीन परिस्थितीतही याचा गंभीर परिणाम होत असल्याने फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली.
मुख्याधिकारी जाधव यांनी सांगितले की, संबंधित विक्रेत्यांना नियोजनबद्ध पद्धतीने नव्याने बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. अतिक्रमण हटवल्याने नागरिक व खरेदीदारांकडून समाधान व्यक्त होत आहे.
मात्र, केवळ सर्वसामान्यांच्या अतिक्रमणावर कारवाई न करता धनदांडग्या व्यक्तींच्या अतिक्रमणावरही समान पद्धतीने कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, एकीकडे रस्त्यांवरील विक्रेत्यांवर नगरपालिका कारवाई करत असताना दुसरीकडे शहरात उघड्यावर सुरू असलेल्या ‘चक्री मटक्या सारख्या आदी अवैध व्यवसायांवर कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे फलटण पोलीस यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, अवैध व्यवसायांना पोलिसांचा आशीर्वाद आहे का, असा सवालही नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.
शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि निष्पक्षपणे कारवाई करणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त होत आहे.
फलटणच्या रस्त्यांवरील अतिक्रमणावर नगरपालिकेची कारवाई; अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष की अभय?
By Team LBNN
On: February 18, 2026 9:23 AM
---Advertisement---









