सांगली – पुरोगामी विचारांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या समान वाटणीला विरोध होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे मत व्यक्त करत, सामाजिक न्यायाच्या या लढ्याचा प्रवास थांबू नये, असे आवाहन सचिन साठे यांनी केले आहे.
देशातील पंजाब, तेलंगणा आदी राज्यांमध्ये आरक्षण वर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध झाला नाही. मात्र महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रातच या निर्णयाला विरोध होत असल्याने सामाजिक ऐक्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सचिन साठे पुढे म्हणाले की, अनुसूचित जाती प्रवर्गातील ५९ जातींपैकी काही जातींना आजही आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. अनेक वर्षांच्या आंदोलन, अभ्यास आणि सर्वेक्षणातून आरक्षण वर्गीकरणाची मागणी पुढे आली असून, ज्या घटकांना कमी लाभ मिळाला त्यांना न्याय मिळावा, हीच या लढ्याची भूमिका आहे.
गेल्या ४० ते ५० वर्षांपासून हा सामाजिक न्यायाचा लढा सुरू असून, अनेक कार्यकर्त्यांनी आपले आयुष्य या आंदोलनात घालवले आहे. मात्र आजही अतिवंचित समाजातील तरुण शिक्षित असूनही बेरोजगारीमुळे मजुरीकडे वळत आहेत, काही जण व्यसनाधीनतेकडे जात असून समाजाची मोठी हानी होत आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्यात आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न अंतिम टप्प्यात असताना काही राजकीय नेते या निर्णयाला विरोध करत आहेत. हे वंचित घटकांच्या न्यायाच्या विरोधात असल्याचे सांगत, अशा प्रवृत्तींचा निषेध त्यांनी व्यक्त केला.
अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व अतिवंचित आणि उपेक्षित घटकांना आरक्षणाचा समान आणि न्याय्य वाटा मिळावा, हा संविधानिक अधिकार असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हा लढा पुढे चालू ठेवणे आवश्यक असल्याचे साठे यांनी स्पष्ट केले.
पुरोगामी महाराष्ट्रात अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या सामाजिक न्यायाचा लढा थांबू नये – सचिन साठे
By Team LBNN
On: April 16, 2026 3:55 PM
---Advertisement---






