मुंबई / बारामती : राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी च्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती C. P. राधाकृष्णन यांची भेट घेत त्यांनी राजीनामा सादर केला.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजय मिळवत आमदार झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. नियमानुसार एखादी व्यक्ती दोन सभागृहांमध्ये निवडून आल्यास 14 दिवसांच्या आत एका सभागृहाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणे बंधनकारक असते. त्यामुळे निकाल जाहीर होताच सुनेत्रा पवार यांनी खासदारकीचा राजीनामा दिला.
दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे आली होती. त्यानंतर त्यांच्या खासदारकीच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती.
दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना तब्बल 2 लाख 18 हजार 930 मते मिळाली, तर त्यांच्या विरोधातील 22 उमेदवार आणि ‘नोटा’ला मिळून केवळ 4 हजार 837 मते मिळाली. त्यामुळे 2019 मध्ये अजित पवार यांनी केलेला मताधिक्याचा विक्रमही त्यांनी मोडला आहे.
या निवडणुकीत करुणा शर्मा, अभिजित बिचुकले यांच्यासह 22 उमेदवार मैदानात होते. बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न झाले होते, मात्र उमेदवारांनी माघार न घेतल्याने मतदान घेण्यात आले.
विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यापूर्वीच त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली होती.
विजयानंतर माध्यमांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांचे आभार मानले.
बारामतीत विक्रमी विजय मिळवल्यानंतर सुनेत्रा पवारांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा
By Team LBNN
On: May 6, 2026 7:32 PM












