आजूबाजूला नजर टाकताना एक विचार सहज डोकावतो—आज नात्यांमध्ये खून का वाढत आहेत?
खरंतर, “माणसाला मारण्यापूर्वी तो दुसऱ्याच्या मनात मरतो.”
ही ओळ जितकी साधी वाटते तितकीच भयावह आहे.
अलीकडच्या काही महिन्यांत अशा अनेक घटना समोर आल्या, ज्यांनी समाजाला हादरवून सोडलं. लग्नानंतर काही दिवसांत जोडीदाराचा मृत्यू, प्रेमसंबंधांमधील कटकारस्थानं, पैशासाठी, प्रतिष्ठेसाठी किंवा दुसऱ्या नात्यासाठी केलेले खून… अशा प्रत्येक घटनेनंतर समाज संतापतो, काही दिवस चर्चा करतो आणि नंतर पुढच्या बातमीकडे वळतो.
पण आपण कधी थांबून विचार केला आहे का?
ही फक्त गुन्हेगारी आहे की आपल्या समाजाच्या मूल्यव्यवस्थेतील तडा आहे?
खून हा केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नसतो. तो विश्वासाचा मृत्यू असतो. प्रेमाचा मृत्यू असतो. कुटुंबाच्या स्वप्नांचा मृत्यू असतो आणि सर्वांत मोठं म्हणजे तो माणुसकीचा मोठा पराभव असतो.
आज जग पूर्वीपेक्षा अधिक जोडलेलं आहे. एका क्लिकवर हजारो लोकांशी संपर्क होतो. पण मनं मात्र पूर्वीपेक्षा अधिक एकटी पडली आहेत.
आपण संवाद करतो, पण मन मोकळं करत नाही.
आपण प्रेम व्यक्त करतो, पण जबाबदारी स्वीकारत नाही.
आपण लग्न करतो, पण नातं समजून घेण्यासाठी वेळ देत नाही.
आपण जोडीदार शोधतो, पण सहप्रवासी शोधत नाही.
नातं हे दोन परिपूर्ण माणसांचं नसतं; ते दोन अपूर्ण माणसांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचं नाव असतं. हेच आजकाल जग विसरून चाललं आहे….
खरंतर कोणताही गुन्हा हा एका दिवसात जन्म घेत नाही.
तो खोट्याच्या पहिल्या पायरीवर सुरू होतो.
तो संवाद थांबतो तेव्हा वाढतो.
तो अहंकाराने पोसला जातो.
तो स्वार्थाने मजबूत होतो.
आणि शेवटी विवेक हरला की हिंसेत बदलतो, कुठलीच शंका न येऊ देता…
ज्या क्षणी एखादा जोडीदार दुसऱ्याला “माणूस” म्हणून न पाहता “समस्या” म्हणून पाहू लागतो, त्या क्षणी नातं संपायला सुरुवात होते. हे आधी समजून घ्यायला हवं.
आता आपण म्हणू की, आता नेमकं कसं ओळखणार?
कारण प्रत्येक प्रकरण वेगळं असतं. म्हणून एकच कारण सांगणं चुकीचं ठरेल. पण अनेक घटनांमध्ये काही समान धागे दिसतात. ते असे—
– व्यक्तींमधील संवादाचा अभाव.
– विवाहापूर्वी प्रामाणिक चर्चा न होणं.
– जबरदस्तीची किंवा अनिच्छेची लग्नं.
– विवाहबाह्य संबंध आणि त्याबद्दल सत्य सांगण्याची भीती.
– पैशाचा, मालमत्तेचा किंवा विम्याचा लोभ.
– “लोक काय म्हणतील?” या भीतीमुळे चुकीचं नातं टिकवण्याचा प्रयत्न.
– राग, मत्सर आणि सूडभावना.
– मानसिक आरोग्याकडे होणारं मोठं दुर्लक्ष.
– सोशल मीडियामुळे निर्माण झालेल्या अवास्तव अपेक्षा.
या कारणांपैकी कोणतंच कारण खुनाचं समर्थन करू शकत नाही. पण ती कारणं समजून घेतली, तर अशा घटना रोखण्यासाठी मार्ग नक्की शोधता येऊ शकतो.
पुढे जाऊन अजून विचार येतो…
आपण मुलांना अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, तंत्रज्ञान शिकवलं.
पण त्यांना हे शिकवलं का—
नकार स्वीकारणं म्हणजे पराभव नाही.
वेगळं होणं म्हणजे अपयश नाही.
राग आला म्हणून हिंसा योग्य ठरत नाही.
प्रेम म्हणजे मालकी हक्क नाही.
आणि प्रामाणिकपणे सत्य सांगणं हे कोणत्याही कटकारस्थानापेक्षा धैर्याचंच असतं.
आज शाळांमध्ये गुण शिकवले जातात; पण भावना समजून घेण्याचं शिक्षण अजूनही दुर्मिळ आहे.
खरंतर हा प्रश्न समाजाने नव्याने विचारायला हवा.
जर दोन माणसं एकत्र राहून एकमेकांना फसवत असतील, मानसिक त्रास देत असतील किंवा हिंसेच्या उंबरठ्यावर पोहोचली असतील, तर सन्मानाने वेगळं होणं हा पराभव नाही; तो प्रगल्भतेचा निर्णय आहे.
आजचा एक विचार पुढची पिढी वाचवते, हे लक्षात ठेवा…
बदल फक्त कायद्यांनी होणार नाही. तो घरातून सुरू होईल आणि तो आपण सर्वांनी करायला पुढे यायला हवं.
मुलगा आणि मुलगी दोघांनाही समान मूल्यसंस्कार द्या.
लग्नापूर्वी अपेक्षा, ध्येय आणि स्वभावाबद्दल मोकळेपणाने चर्चा करा. किंबहुना मुलामुलींना आधी बोलू द्या. कारण पुढे जाऊन आपल्या मुलांचा असा फोटो किंवा बातमी टीव्हीवर दिसू नये, हा तरी विचार करून आधी बोलू द्या. त्यासोबतच स्वतःही संवाद साधा…..
बाकी आजच्या पिढीनेही कुठलंही नातं टिकवण्याइतकंच सन्मानाने संपवण्याचाही अधिकार मान्य करायला शिकलं पाहिजे…
समाज मोठ्या युद्धांनीच नष्ट होत नाही.
तो लहान-लहान खोट्यांनी, स्वार्थांनी, अहंकारांनी आणि मौनाने आतून पोखरला जातो.
आपण चांगली घरं बांधली.
मोठ्या गाड्या घेतल्या.
तंत्रज्ञानात प्रगती केली.
पण जर आपल्या मुलांना सत्य, संयम, करुणा आणि माणुसकी शिकवली नाही, तर उद्याचं भविष्य काचेसारखं चमकेल; पण आतून तुटलेलं असेल.
आज प्रत्येक आई-वडिलांनी, प्रत्येक शिक्षकाने, प्रत्येक तरुणाने आणि प्रत्येक समाजघटकाने स्वतःला एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे—
आपण यशस्वी माणसं घडवत आहोत की चांगली माणसं?
कारण चांगली माणसं निर्माण झाली तर चांगली नाती निर्माण होतील.
चांगली नाती निर्माण झाली तर विश्वास टिकेल.
आणि विश्वास टिकला तर बातम्यांमध्ये खुनांचे मथळे कमी होतील, आणि आयुष्यभर साथ निभावणाऱ्या नात्यांच्या कथा अधिक वाचायला मिळतील.
शेवटी काय हो….
“प्रेमाचा शेवट वेगळं होण्यात होऊ शकतो; पण प्रेमाच्या नावाखाली एखाद्याचा जीव घेण्यात नाही.
कारण नातं तुटलं तर दोन मनं जखमी होतात; पण खून झाला तर संपूर्ण समाज रक्तबंबाळ होतो.”
— क्रांती ज्ञानेश्वर शेलार, नाशिक
९१५८३८५६९०
प्रेमाचा मृत्यू की माणुसकीचा?
By Team LBNN
On: July 14, 2026 9:14 PM








