महाराष्ट्रातील साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण, उद्योग, व्यवसाय, सहकार, राजकारण, सामाजिक कार्य, पत्रकारिता, विधी, वैद्यकीय, कृषी आणि इतर विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या लेखनाचा व विचारांचा अनोखा संगम
फलटण : ‘लोकशाही भारत न्यूज’ प्रस्तुत ‘आद्य दीपोत्सव – दिवाळी विशेषांक २०२६’च्या आकर्षक मुखपृष्ठाचे ऑनलाइन अनावरण करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील लेखक, कवी, साहित्यिक तसेच शैक्षणिक, औद्योगिक, विधी आणि वैद्यकीय क्षेत्रांतील मान्यवरांच्या विचारांचा आणि साहित्याचा सुंदर संगम या विशेषांकातून वाचकांसमोर येणार आहे.
गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या साहित्यिक उपक्रमाला यंदा महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे, यंदाचा विशेषांक मागील विशेषांकांच्या तुलनेत दुप्पट आकारात प्रकाशित होत आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थिती, सामाजिक प्रश्न, दिवाळीचे सांस्कृतिक महत्त्व, वास्तववादी लेखन, कविता, कायदेविषयक मार्गदर्शन आणि आरोग्यविषयक माहिती अशा विविध विषयांचा या विशेषांकात समावेश करण्यात आला आहे.
आर्थिक आणि नैसर्गिक अडचणी असतानाही पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील वैचारिक चळवळ जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने हा विशेषांक साकारण्यात आला आहे. प्रतिकूल परिस्थितीतही विचारांची ज्योत तेवत ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.
या विशेषांकाच्या निर्मिती प्रक्रियेत विशेष स्तंभलेखिका तथा संपादकीय समितीच्या सदस्या कु. क्रांती शेलार, ॲड. आकाश आढाव आणि लोकशाही भारत न्यूजच्या पत्रकार टीमचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
“दिवाळीत आपण घराघरांत दिवे लावतो; पण विचारांचा प्रकाश समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम साहित्य करत असते,” या संकल्पनेतून साकारलेला ‘आद्य दीपोत्सव – दिवाळी विशेषांक २०२६’ साहित्यप्रेमी आणि वाचकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
विशेषांक संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.









