सातारा – क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे असलेल्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्र वितरण विभागात नागरिकांच्या मूलभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात वानवा असल्याचे समोर आले आहे. या विभागात दररोज नागरिकांची भलीमोठी रांग लागत असून, त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला व ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना तासन्तास उभे राहावे लागत आहे.
विशेष म्हणजे सर्व्हर डाऊन झाल्यास नागरिकांना अधिक वेळ थांबावे लागते. मात्र, या ठिकाणी कोणतीही बैठक व्यवस्था नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. रांगेच्या ठिकाणी पंख्यांची सुविधा नसल्यामुळे उकाड्यात नागरिक घामाघूम होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या ठिकाणी रांग नाही, त्या ठिकाणी मात्र पंखे सुरू असल्याचे नागरिकांनी सांगितले.
तसेच पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विभागात सुरक्षारक्षक नेमण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे. योग्य माहिती मिळत नसल्यामुळे नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.
दरम्यान, कार्यालयातील अनेक ठिकाणचे सिलिंग पडलेल्या अवस्थेत असून काही भाग धोकादायक स्थितीत असल्याने कर्मचारी वर्गातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
सातारा जिल्हा रुग्णालयातील जन्म-मृत्यू प्रमाणपत्र विभागात नागरिकांची गैरसोय
By Team LBNN
On: May 11, 2026 12:57 PM






