सातारा : महाराष्ट्रात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सातारा जिल्हा परिषदेत मात्र सत्तेबाहेर राहावे लागल्याची नाट्यमय घडामोड आज घडली. जिल्हा परिषदेला ‘मिनी मंत्रालय’ मानले जात असताना, पुरेसे संख्याबळ असूनही शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीला सत्ता स्थापनेत अपयश आल्याने जिल्ह्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.
गेल्या महिनाभरापासून जिल्हा परिषदेत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार, तसेच अध्यक्षपद त्यांच्या गोटात जाणार, असे संकेत दिले जात होते. जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही सत्ता स्थापनेबाबत सकारात्मक भूमिका मांडली होती. मात्र, दुसरीकडे मंत्री जयकुमार गोरे यांनी सुरुवातीपासूनच जिल्हा परिषदेत भाजपचाच अध्यक्ष होईल, असा ठाम दावा केला होता.
दरम्यान, आज सत्ता स्थापनेसाठी पालकमंत्री शंभूराज देसाई व मंत्री मकरंद पाटील यांनी शिवसेना-राष्ट्रवादीच्या सदस्यांसह जिल्हा परिषदेत उपस्थिती लावली. यावेळी पोलिस प्रशासनासोबत त्यांचा वाद झाल्याची माहिती समोर आली. मंत्री शिवेंद्रराजे भोसले हेही आक्रमक भूमिकेत दिसून आले. हा घटनाक्रम भाजपचे डॉक्टर दिलीप येळगावकर यांनी स्वतः जिल्हा परिषदेच्या बाहेर पत्रकारांशी संवाद साधताना सांगितला.
विशेष म्हणजे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना गंभीर आरोप करत सांगितले की, “मी जिल्ह्याचा पालकमंत्री आणि राज्याचा मंत्री असतानाही पोलिसांनी माझी धरपकड केली. तसेच मंत्री मकरंद पाटील यांनाही दहा दहा पोलिसांनी पकडले . सातारा पोलीस प्रशासन भाजपचे घरगडी असल्यागत काम करत आहे ,” असा आरोप त्यांनी केला. या विधानामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
सत्ता स्थापनेच्या वेळी आणखी एक नाट्यमय वळण आले. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीच्या अनिल देसाई आणि संदीप मांडवे या दोन सदस्यांना मतदानापूर्वीच सभागृहातून पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली. सातारा जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणल्यानंतर त्यांनी “आमच्यावर खोटा अपहरणाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली,” असा आरोप देसाई व मांडवे यांनी केला. तसेच, भाजपकडून कामेश कांबळे या सदस्याचा हात त्यांच्या इच्छेविरुद्ध वर करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.
अखेर झालेल्या मतदानात भाजपला ३3 मते मिळाली, तर शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीला ३0 मते मिळाली. 3 मताने सत्ता बदलत भाजपने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली.
यामध्ये भाजपच्या डॉ. प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड झाली असून त्या कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत. तसेच भाजपचे राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे साताऱ्याच्या ‘मिनी मंत्रालयावर’ भाजपचा झेंडा फडकला आहे. मात्र यानंतर सुद्धा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या घडलेल्या घटनेबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचं प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केलं आहे.










