सातारा – मराठी भाषेतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेचा भक्कम पाया घातला. ६ जानेवारी १८३२ रोजी त्यांनी मराठीतील पहिले नियतकालिक ‘दर्पण’ सुरू केले. भाषाशास्त्रज्ञ गोविंद कुंटे (भाऊ महाजन) यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या या वृत्तपत्राचा उद्देश जनसामान्यांपर्यंत विचार, माहिती आणि समाजप्रबोधन पोहोचवणे हा होता. त्यामुळे ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले. तसेच इंग्रज सत्ताधाऱ्यांना स्थानिक जनतेच्या अडचणी, भावना व सामाजिक वास्तव कळावे यासाठी त्यामध्ये इंग्रजी भाषेतील स्वतंत्र स्तंभही लिहिला जात असे, ही बाब त्या काळातील बाळशास्त्रींची दूरदृष्टी दर्शवते.
त्या काळात वृत्तपत्राची संकल्पना सर्वसामान्यांमध्ये फारशी रुजलेली नसल्याने ‘दर्पण’ला सुरुवातीला अपेक्षित वर्गणीदार मिळाले नाहीत. मात्र जसजशी ही संकल्पना समाजात रुजत गेली, तसतसा ‘दर्पण’मधील विचारांचा प्रभाव वाढत गेला आणि वाचकांचा प्रतिसादही मिळू लागला. ब्रिटिश राजवटीत कोणताही नफ्याचा विचार न करता, स्वतः पदरमोड करून समाजसुधारणेच्या ध्येयाने चालवलेले ‘दर्पण’ हे त्या काळातील अग्रगण्य व मार्गदर्शक वृत्तपत्र ठरले. १८३२ मध्ये सुरू झालेले ‘दर्पण’ तब्बल आठ वर्षे म्हणजेच जुलै १८४० पर्यंत नियमितपणे प्रकाशित झाले.
मराठी पत्रकारितेच्या इतिहासात ६ जानेवारी १८३२ हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याने, याच दिवशी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाल्याच्या स्मरणार्थ ६ जानेवारी हा दिवस ‘दर्पण दिन’ अथवा ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती नसून, मराठी पत्रकारितेच्या जन्माचा आणि तिच्या सामाजिक बांधिलकीचा गौरव करणारा दिवस आहे. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म २० फेब्रुवारी १८१२ रोजी तर मृत्यू १७ मे १८४८ रोजी झाला असून, या तारखा महाराष्ट्र शासनाने अधिकृतरीत्या निश्चित केलेल्या आहेत.











