सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

सामाजिक बांधिलकी जपणारे प्रा.विकास शिंदे
समाजाभिमुख निर्भीड पत्रकार, लेखक, कवी आणि चळवळींचे मार्गदर्शक

On: March 14, 2026 8:07 AM
Follow Us:
---Advertisement---


सामाजिक बांधिलकी जपणारे, अडचणीत असणाऱ्यांना तत्पर मदत करणारे, मानवता आणि निसर्गावर अपार प्रेम असलेले निसर्गप्रेमी, साहित्यप्रेमी पत्रकार प्रा. विकास शिंदे यांची समाजात वेगळी ओळख निर्माण झाली आहे.”


फलटण – प्रा. विकास शिंदे यांची जडणघडण सामाजिक कार्य करणारे ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे आणि साखरशाळा प्रकल्पाच्या जन्मदात्या लेखिका सुलेखा शिंदे यांच्या संस्कारातून झाली. लहानपणापासूनच चळवळी, संघर्ष आणि आंदोलने त्यांनी जवळून पाहिली. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे आणि समाजासाठी लढणारे समाजाभिमुख निर्भीड पत्रकार म्हणून प्रा. विकास शिंदे यांची सातारा जिल्ह्यात ओळख आहे.
प्रा. विकास शिंदे यांचे संपूर्ण शिक्षण फलटणमध्येच झाले. यशवंतराव चव्हाण हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मराठी विषयातून पदवी घेतली. पुढे मराठी विषयात एम.ए. करून शिक्षणशास्त्र विषयातून बी.एड. व एम.एड. ही पदवी प्राप्त केली. पत्रकारितेची आवड त्यांना लहानपणापासूनच होती. चौथी-पाचवीत असतानाच त्यांनी दैनिक शिवसंदेशसाठी लेखन केले. शिवसंदेशचे संपादक कॉ. हरिभाऊ निंबाळकर यांनी त्यांच्या लेखनाचे कौतुक करत त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
सनबूर (ता. पाटण) येथील महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये त्यांनी काही वर्षे अध्यापनाचे कामही केले. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व मराठी भाषेच्या अभ्यासक डॉ. मॅक्सिन बर्नसन यांच्या सोबत फलटण तालुक्यातील प्राथमिक शाळांमध्ये वाचन-लेखन प्रकल्प आणि इंग्रजी सुधार प्रकल्पावर त्यांनी काम केले. या काळात डॉ. बर्नसन यांचे त्यांना अनमोल मार्गदर्शन लाभले.
पत्रकारितेची आवड जोपासत त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विषयात पदवी संपादन केली. गेली पंधरा वर्षे त्यांनी विविध साप्ताहिके आणि दैनिकांसाठी लेखन केले आहे. साप्ताहिक लोकजागर, विचार संगम, फलटण अंजन, दैनिक शिवसंदेश, दैनिक स्थैर्य, एकतादर्शन यांसारख्या माध्यमांमध्ये त्यांनी लेखन केले. मागील तीन वर्षांपासून ते दैनिक लोकमतचे फलटण तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत असून त्यांच्या समाजाभिमुख आणि बदल घडवणाऱ्या बातम्यांमुळे त्यांची विशेष ओळख निर्माण झाली आहे.
लहान वयातच त्यांना ज्येष्ठ समीक्षक व विचारवंत ग. प्र. प्रधान यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रेरणेने प्रा. विकास शिंदे यांनी वाचलेल्या पुस्तकांच्या समीक्षा लिहिण्यास सुरुवात केली. त्यातूनच त्यांचे “ज्ञानबोध” हे समीक्षात्मक पुस्तक तयार झाले आणि अल्पावधीत लोकप्रियही झाले.
यापूर्वी “वाळूचे घर” हा त्यांचा बालकविता संग्रह संस्कार भारती, फलटण यांनी प्रकाशित केला आहे. शिक्षण विषयावर आधारित “पहिल्या बाकावरची मुलं” ही त्यांची दीर्घ कादंबरी लवकरच प्रकाशित होणार आहे. साखरशाळेतील मुलांच्या शैक्षणिक अभ्यासावर त्यांनी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाकडे शोध निबंधही सादर केला आहे.
फलटण साहित्य परिषदेचे ते सदस्य असून फलटणमध्ये “साहित्य संवाद” या साहित्यिक विचारांच्या देवाणघेवाणीचे व्यासपीठ त्यांनी उभे केले आहे. या उपक्रमात प्रा. ताराचंद्र आवळे व रानकवी राहुल निकम यांचीही मोलाची साथ आहे.
महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे साहित्यिक पत्रकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. फलटणमधील विविध सामाजिक चळवळींमध्ये मार्गदर्शक चेहरा म्हणूनही त्यांची ओळख आहे. ते राजकारणात सक्रिय नसले तरी सामाजिक एकता, बंधुता आणि लोकशाही मूल्ये जपण्यावर त्यांचा भर असतो. जात, धर्म, पंथ यापलीकडे माणसाला माणूस म्हणून जगू द्यावे हा त्यांचा विचार असल्याने सर्व समाजघटकांमध्ये त्यांचे स्नेहसंबंध आहेत.
प्रा. विकास शिंदे हे सध्या भारतीय पत्रकार संघाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष असून नव्या पत्रकारांसाठी ते नेहमीच मार्गदर्शक ठरतात. पत्रकारिता ही सामाजिक बदल घडवण्यासाठीचे प्रभावी माध्यम असून लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांनी निर्भीडपणे लिहावे, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

हे ही वाचा  लोकशाही भारत न्यूज नेटवर्कला वृत्तपत्रासाठी प्रतिनिधी हवेत

विकास सर आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!