सातारा : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून मतदारसंघात तात्काळ प्रभावाने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. संबंधित सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने ही निवडणूक होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक घेण्यासाठी किमान ७५ टक्के स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असणे तसेच ७५ टक्के मतदार अस्तित्वात असणे आवश्यक असते. यापूर्वी हे निकष पूर्ण न झाल्यामुळे निवडणूक होऊ शकली नव्हती. मात्र आता आवश्यक निकष पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
निवडणूक कार्यक्रम
अधिसूचना प्रसिद्ध : २५ मे २०२६
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत : १ जून २०२६
अर्ज छाननी : २ जून २०२६
अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत : ४ जून २०२६
मतदान : १८ जून २०२६
मतदानाची वेळ : सकाळी ८ ते सायंकाळी ४
मतमोजणी : २२ जून २०२६
निवडणूक प्रक्रिया पूर्ण : २५ जून २०२६
या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी सांगली यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी सांगली आणि सातारा हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगरपालिका व नगरपंचायतींचे अध्यक्ष तसेच सदस्यांना मतदानाचा अधिकार असणार आहे. एकूण ४७२ मतदार मतदान करणार असून त्यामध्ये नगरपालिका व नगरपंचायतींचे ३९६ तर जिल्हा परिषद मतदार ७६ आहेत.
मतदानासाठी सातारा जिल्ह्यात सातारा, वाई, फलटण, माण-खटाव, कोरेगाव, कराड आणि पाटण येथे एकूण सात मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा बिगुल; १८ जूनला मतदान, २२ जूनला मतमोजणी
By Team LBNN
On: May 19, 2026 8:21 PM











