सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह नऊ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित १२ जागांसाठी निवडणूक होणार असून, विविध मतदारसंघांत दिग्गज नेत्यांसह अनेक उमेदवार आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
नऊ उमेदवारांची बिनविरोध निवड
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्जेराव सावंत (सोसायटी, सातारा), सत्यजित वीर (वाई सोसायटी), नंदकुमार मोरे (खटाव सोसायटी), अतुल भोसले (प्रक्रिया उद्योग), मकरंद पाटील (खरेदी-विक्री संघ), काका धुमाळ (गृहनिर्माण व दूध संस्था), रणजितसिंह नाईक निंबाळकर (पतसंस्था व पतपेढी), ऋतुजा पाटील वाठारकर (राष्ट्रवादी महिला राखीव) आणि मंगल पाटील (शिवसेना महिला राखीव) यांची बिनविरोध निवड झाली आहे.
उर्वरित १२ जागांसाठी चुरस
जिल्हा बँकेच्या उर्वरित १२ जागांसाठी विविध मतदारसंघांत लढती रंगणार आहेत. जावळी मतदारसंघात विठ्ठल गोळे विरुद्ध ज्ञानदेव रांजणे, तर महाबळेश्वर मतदारसंघात रूपाली राजपुरे विरुद्ध संजय मोरे अशी लढत होणार आहे. जयकुमार गोरे, शेखर गोरे आणि मनोज पोळ यांच्यातही सामना रंगणार आहे.
याशिवाय चंद्रकांत जाधव विरुद्ध सुनील वाघ, शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजित पाटणकर, उदयसिंह उंडाळकर विरुद्ध धनाजी पाटील, सुनील माने विरुद्ध सुनील खत्री, योगेश फडतरे विरुद्ध संदीप पाचंगणे आणि अनिरुद्ध गाडवे विरुद्ध अजय भोसले यांच्यात लढत होणार आहे.
संजीवराजे विरुद्ध समशेरसिंह; राजकीय वर्तुळाचे लक्ष
संजीवराजे नाईक निंबाळकर विरुद्ध समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील लढतीकडे विशेष लक्ष लागले आहे. तसेच भटके-विमुक्त प्रवर्गातून अर्जुन काळे विरुद्ध सुनील वाघ अशी लढत होणार आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गात दीपक चव्हाण, रवींद्र बडेकर, सुरेश गायकवाड आणि सत्यवान कांबळे यांच्यात चौरंगी लढत होणार आहे.
नऊ जागांवरील बिनविरोध निवडीनंतर उर्वरित जागांसाठी होणाऱ्या लढतींमुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत चुरस वाढली आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर बिनविरोध; संजीवराजे विरुद्ध समशेरसिंह यांच्या लढतीकडे लक्ष!
By Team LBNN
On: October 22, 2026 11:40 AM












