
फलटण – “महाराष्ट्र सध्या तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करत असून ‘उष्माघात’ (Heat Stroke) हा अत्यंत गंभीर आणि जीवघेणा आजार ठरू शकतो. नागरिकांनी वेळीच सावध राहणे अत्यावश्यक आहे,” असे आवाहन निकोप हॉस्पिटल, फलटण येथील फिजीशियन व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जे. टी. पोळ यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, शरीराचे तापमान नियंत्रित राहिले नाही तर उष्माघात होतो आणि तापमान १०४° फॅरेनहाइट (४०° सेल्सिअस) च्या पुढे गेल्यास मेंदू, हृदय व मूत्रपिंडांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. देशात दरवर्षी शेकडो मृत्यू या कारणामुळे होत असून २०२५ मध्ये ८४ हून अधिक मृत्यू नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्रातही ही समस्या गंभीर बनत असून सातारा जिल्हा व फलटण परिसरात तापमान ३७ ते ४० अंशांच्या पुढे जात असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. पोळ यांनी पुढे सांगितले की, उष्माघाताची लक्षणे म्हणून शरीराचे तापमान वाढणे, घाम थांबणे, डोकेदुखी, चक्कर, उलट्या, हृदयाचे ठोके वाढणे, मानसिक गोंधळ किंवा शुद्ध हरपणे अशी चिन्हे दिसतात. यासाठी दिवसातून १२ ते १५ ग्लास पाणी पिणे, ताक, लिंबू सरबत, शहाळे व ओआरएसचा वापर करणे, दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळणे, सैल सुती कपडे परिधान करणे आणि पाणीदार फळांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. जर कोणाला उष्माघाताचा त्रास झाला तर त्याला त्वरित सावलीत नेऊन थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, पाणी द्यावे आणि विलंब न करता रुग्णालयात दाखल करावे. विशेषतः हृदयरोगी व ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.











