फलटण – परिस्थिती गरिबीची, घरची आर्थिक ओढाताण; पण बुद्धिमत्ता, जिद्द आणि कष्ट यांच्या बळावर आयटी क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या सुमित हणमंत जाधव यांनी आपल्या यशाचे श्रेय घडविणाऱ्या शाळेला देत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे.आपण ज्या परिस्थितीतून पुढे आलो, त्याच परिस्थितीतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांनाही शिक्षणासाठी आधार मिळावा, या भावनेतून त्यांनी सलग पाचव्या वर्षी आपल्या शाळेतील दहा विद्यार्थ्यांना सुमारे २५ हजार रुपयांचे संपूर्ण शालेय साहित्य भेट दिले.
सुमित जाधव हे महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळा आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.त्यांनी आपल्यातील इ.1 ली ते 10 वी तील 10 विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय साहित्याचे वाटप केले.या कार्यक्रमास सुमित जाधव यांचे आई जयश्री व वडील हणमंत जाधव,पत्नी मोहिनी,मुलगा वीरधवल,मुख्याध्यापक मनीष निंबाळकर प्राथमिक,अरूण खरात (माध्यमिक),
सुरेखा सोनवले (बालवाडी) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सध्या ते मुंबईतील एका आयटी कंपनीत वरिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या सुमित यांनी शिक्षणाच्या प्रवासात अनेक आर्थिक अडचणींचा सामना केला.मात्र मुख्याध्यापक मनीष निंबाळकर व सर्व शिक्षक यांचे सहकार्य आणि स्वतःची जिद्द यांच्या बळावर त्यांनी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून आयटी क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले.
यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही आपल्या शाळेला आणि गुरूंना विसरून न जाता त्यांनी शाळेतील गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा उपक्रम सातत्याने सुरू ठेवला आहे. त्यांच्या या कृतीतून शाळेबद्दलची कृतज्ञता, समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि शिक्षणातून समाजऋण फेडण्याची भावना अधोरेखित होत आहे.
“मोठे होणे महत्त्वाचे असतेच; पण मोठे झाल्यानंतर आपल्याला घडविणाऱ्या शाळेकडे आणि समाजाकडे कृतज्ञतेने पाहणे त्याहून महत्त्वाचे आहे. सुमित जाधव यांची ही प्रेरणादायी वाटचाल अनेक तरुणांसाठी आदर्श ठरेल,”असे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांनी सांगितले.
सुमितचे शाळेविषयी असलेले प्रेम आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी त्यांनी सुरू ठेवलेला हा उपक्रम निश्चित प्रेरणादायी असे मुख्याध्यापक अरूण खरात यांनी सांगितले.
आपल्याला घडविणारी शाळा आणि मदतीचा हात देणारे माझे गुरूवर्य यांचे ऋण मी कधीही विसरू शकत नाही.या शाळेप्रती आपुलकी,प्रेम कायम राहील.
ज्या परिस्थितीतून पुढे आलो,त्याच परिस्थितीतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांनाही शिक्षणासाठी मी कायम मदत करत राहणार आहे.त्यांच्या स्वप्नांना बळ देत,त्यांच्या यशात सहभागी होणे हीच माझ्यासाठी खरी कृतज्ञता आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधानच माझे खरे बक्षीस आहे असे सुमित जाधव यांनी यावेळी सांगितले
प्रारंभी मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांनी सुमित जाधव आणि त्यांचे कुटुंबीय यांचे स्वागत करून त्यांना धन्यवाद दिले.
किशोर पवार यांनी आभार मानले.
गरिबीवर मात करत आयटी क्षेत्रात यश; माजी विद्यार्थ्याची शाळेला कृतज्ञतेची अनोखी परतफेड
By Team LBNN
On: July 2, 2026 8:30 PM










