मुंबई / पुणे – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणारा महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प १ मे पासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रकल्पाची पाहणी केली.
या प्रकल्पाचे सुमारे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, घाट विभागातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान व सुरक्षित होणार आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय दूर होऊन दळणवळण सुधारेल आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असे शिंदे यांनी सांगितले.
सुमारे १०.५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट तसेच टायगर व्हॅली परिसरात सुमारे १८२ मीटर उंचीचा केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. सुमारे २३.७५ मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो.
तसेच लोणावळा तलावाच्या सुमारे १८२ मीटर खाली हा मार्ग जात असल्यामुळे प्रकल्प पूर्ण करणे मोठे आव्हान होते. मात्र महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MSRDC) ने हे आव्हान यशस्वीरीत्या पार पाडल्याचे शिंदे यांनी सांगत संस्थेचे कौतुक केले.
या प्रकल्पामुळे घाटातील वळणदार मार्ग टाळला जाणार असून वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. विशेष म्हणजे, प्रकल्प सुरू झाल्यानंतर टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या वेळी खासदार श्रीरंग बरणे , माजी नगरसेवक आबासाहेब बागुल, तसेच MSRDC आणि संबंधित कंपन्यांचे अधिकारी व अभियंते उपस्थित होते.








