फलटण : भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘वाचन प्रेरणा दिन – २०२६’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
फ. ए. सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग, विवेकवाहिनी आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता महाविद्यालयातील प्राचार्य शिवाजीराव भोसले सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. सीता जगताप प्रमुख पाहुण्या व वक्त्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. एच. कदम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. डॉ. प्रभाकर पवार व प्रा. डॉ. अशोक शिंदे, तर सहसंयोजक म्हणून प्रा. शैला क्षीरसागर व डॉ. गौरी गायकवाड काम पाहणार आहेत.
वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्यातून आणि विचारांतून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, तसेच वाचनाचे महत्त्व अधोरेखित व्हावे, या हेतूने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुधोजी महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
मुधोजी महाविद्यालयात आज वाचन प्रेरणा दिन; प्रा. डॉ. सीता जगताप यांचे विशेष व्याख्यान
By Team LBNN
On: October 15, 2026 8:56 AM






