दिल्ली : फलटण येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे नंदकुमार मोरे यांचे थोरले चिरंजीव लखन मोरे यांनी भारतीय पुरुष सॉफ्ट हॉकी संघाचे नेतृत्व करत आंतरराष्ट्रीय स्तरावर फलटणच्या नावाला मानाचा तुरा मिळवून दिला आहे. नेपाळची राजधानी काठमांडू येथे पार पडलेल्या पहिल्या साऊथ एशियन सॉफ्ट हॉकी चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने शानदार कामगिरी करत अजिंक्यपद पटकावले.
२० ते २२ मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत भारतासह नेपाळ, भूतान आणि पाकिस्तान या देशांच्या संघांचा सहभाग होता. भारतीय पुरुष संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी लखन मोरे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजवत प्रत्येक सामन्यात दमदार खेळाचे प्रदर्शन केले.
अंतिम सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाचा तब्बल ११-१ अशा दणदणीत फरकाने पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयामुळे देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, फलटण तालुक्यासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब मानली जात आहे.
लखन मोरे यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली असून, आता भारतीय संघाचे यशस्वी नेतृत्व करत त्यांनी महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्याचे नावही उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल फलटणमधील सामाजिक, राजकीय, क्रीडा व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, पुढील महिन्यात मलेशिया येथे तीन देशांदरम्यान लिग सामने खेळवले जाणार असून, २०२७ मध्ये पहिल्यांदाच होणाऱ्या सॉफ्ट हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन भारतात होणार आहे. या स्पर्धेत जगातील १४ देश सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.











