मुंबई – अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने खाद्यपदार्थ गुंडाळण्यासाठी, वाढण्यासाठी किंवा पॅकिंगसाठी वर्तमानपत्रांचा वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. एफएसएसएआयनुसार, वर्तमानपत्रांच्या छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये शिसे (Lead) आणि इतर जड धातूंसह विविध हानिकारक रसायने असू शकतात. गरम, तेलकट किंवा ओलसर अन्नपदार्थांचा थेट संपर्क वर्तमानपत्राशी आल्यास ही रसायने अन्नामध्ये मिसळून आरोग्यावर गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात.
याशिवाय वर्तमानपत्रांचे वितरण, साठवण आणि हाताळणीदरम्यान त्यावर धूळ, घाण तसेच विविध प्रकारचे रोगजंतू जमा होण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्न दूषित होऊन अन्नजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. विशेषतः वडापाव, भजी, समोसे आणि इतर तळलेल्या पदार्थांमधील अतिरिक्त तेल शोषण्यासाठीही वर्तमानपत्रांचा वापर टाळावा, असे एफएसएसएआयने म्हटले आहे.
प्राधिकरणाने सर्व खाद्य व्यवसाय चालक, हॉटेल्स, उपाहारगृहे आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना फूड-ग्रेड पॅकेजिंग साहित्याचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. खाद्यपदार्थांच्या पॅकिंगसाठी वर्तमानपत्रांचा वापर करणे हे अन्न सुरक्षा आणि मानके (पॅकेजिंग) नियम, २०१८ च्या तरतुदींविरुद्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आणि स्वच्छ पॅकेजिंगचा वापर करणे आवश्यक असून, विक्रेते आणि ग्राहकांनी वर्तमानपत्रातील पॅकिंग टाळावे, असे आवाहन एफएसएसएआयने केले आहे.
वडापावसह खाद्यपदार्थांच्या पॅकिंगसाठी वर्तमानपत्र वापरू नका; एफएसएसएआयचा इशारा
By Team LBNN
On: June 7, 2026 9:25 AM







