फलटण : नेपाळची राजधानी काठमांडू येथे आयोजित पहिल्या साऊथ एशियन सॉफ्ट हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय पुरुष सॉफ्ट हॉकी संघाने पाकिस्तानचा अंतिम सामन्यात ७-० अशा दणदणीत फरकाने पराभव करत ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. भारतीय संघाचे नेतृत्व महाराष्ट्राचे सुपुत्र लखन नंदकुमार मोरे यांनी कर्णधार म्हणून यशस्वीपणे केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत दक्षिण आशियातील सर्वोच्च मानाचा किताब आपल्या नावावर केला.
या उल्लेखनीय यशाबद्दल भारतीय संघाचे कर्णधार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाच्या वतीने समूहाचे संचालक व युवा उद्योजक सचिन यादव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला तसेच भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सत्कारप्रसंगी बोलताना सचिन यादव म्हणाले, “खेळ हा केवळ स्पर्धेचा विषय नसून शिस्त, समर्पण, नेतृत्व आणि देशभक्तीची भावना विकसित करणारे प्रभावी माध्यम आहे. लखन मोरे यांनी भारतीय संघाचे नेतृत्व करत देशाला अभिमानास्पद यश मिळवून दिले आहे. त्यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास युवा पिढीसाठी आदर्श आहे.”
के. बी. उद्योग समूह सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण, सामाजिक कार्य, कला, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रातील गुणवंतांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सातत्याने करत आहे. विविध क्षेत्रांतील प्रतिभावान व्यक्तींना आर्थिक व नैतिक पाठबळ देत त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी समूहाकडून विविध उपक्रम राबविले जातात.
भारतीय संघाच्या या ऐतिहासिक यशामुळे देशासह महाराष्ट्राचे नावही उज्ज्वल झाले असून लखन मोरे यांच्या नेतृत्वाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारतीय संघ व कर्णधार लखन मोरे यांचे अभिनंदन करत भविष्यातही देशासाठी अशीच उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे, सॉफ्ट हॉकी हा पूर्णपणे भारतात विकसित झालेला खेळ असून त्याचा प्रसार आणि लोकप्रियता दक्षिण आशियाई देशांमध्ये वेगाने वाढत आहे. पहिल्याच साऊथ एशियन सॉफ्ट हॉकी चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावत भारताने या खेळातील आपले वर्चस्व अधोरेखित केले आहे.
भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयानिमित्त कर्णधार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून सत्कार
By Team LBNN
On: June 8, 2026 12:22 PM











