सातारा जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू; काटेकोर पालन करण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश
सातारा – भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित मतदारसंघाच्या क्षेत्रात तत्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
पुणे विभाग पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. दोन्ही मतदारसंघांसाठी पुणे विभागीय आयुक्त हे निवडणूक निर्णय अधिकारी असून, संबंधित जिल्हाधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहेत.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार २९ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर २०२६ असून, अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर २०२६ आहे.
दोन्ही मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार असून, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतमोजणी होईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पूर्ण होणार आहे.
शासकीय यंत्रणेच्या वापरावर निर्बंध
आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन भारत निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेतील तरतुदी आणि निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
शासकीय यंत्रणा, शासकीय वाहने, मनुष्यबळ किंवा शासकीय साधनसामग्रीचा वापर कोणत्याही राजकीय पक्षाच्या अथवा उमेदवाराच्या प्रचारासाठी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच नवीन विकासकामे, उद्घाटने, भूमिपूजन, शासकीय जाहिराती आणि इतर बाबींवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राजकीय पोस्टर्स, बॅनर्स हटविण्याच्या सूचना
आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने सार्वजनिक मालमत्ता विद्रुपण प्रतिबंधक कायदा तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले राजकीय पक्षांचे, राजकीय पदाधिकाऱ्यांचे किंवा संभाव्य उमेदवारांचे पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, भित्तीपत्रके, फलक व इतर प्रचार साहित्य हटविण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.
शासकीय, सार्वजनिक इमारती तसेच सार्वजनिक वापराच्या ठिकाणी आढळणारे अनधिकृत राजकीय प्रचार साहित्य तातडीने हटवावे आणि सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे आवाहन
निवडणूक प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष, पारदर्शक आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सातारा जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, राजकीय पदाधिकारी, संभाव्य उमेदवार, शासकीय अधिकारी-कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच नागरिकांनी भारत निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर
By Team LBNN
On: September 23, 2026 8:36 AM












