सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

संकटाच्या क्षणी शांत डोकं आणि योग्य निर्णयच ठरतो जीवनाचा आधार!

On: October 2, 2026 7:56 AM
Follow Us:

भारतीय कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्या समयसूचकतेच कौतुक करावं तेवढं कमीच..शांत डोक, योग्य निर्णय, कठीण प्रसंगी मनाचं संतुलन ठासळू न देणं बरंच काही शिकवून जातो हा प्रसंग….

३० सप्टेंबर २०२६.

दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या Flydubai च्या FZ1073 विमानात १७४ प्रवासी होते. विमान हजारो फूट उंचीवर स्थिरपणे प्रवास करत असताना अचानक कॉकपिटमध्येच पायलटवर हल्ला झाला.

आणि पुढच्या काही सेकंदांत विमान तब्बल १४,००० फूट खाली आलं.विमानात बसलेल्या प्रवाशांना नेमकं काय घडतंय, हे कळत नव्हतं. घाबरलेले चेहरे, अचानक बदललेली विमानाची हालचाल आणि पुढच्या क्षणी काय होईल याची अनिश्चितता…

अशा वेळी माणसाच्या मनात एकच विचार येतो “आता काय?”पण त्या क्षणी गंभीर जखमी झालेले भारतीय कॅप्टन स्मिथ मच्छार यांनी हार मानली नाही. जखमी अवस्थेतही त्यांनी कॉकपिटचं दार उघडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बाहेरचे प्रवासी आणि क्रू सदस्य आत पोहोचू शकले आणि हल्लेखोराला ताब्यात घेण्यात मदत झाली. विमानात असलेल्या इतर पायलट्सनी नंतर नियंत्रण स्वीकारलं आणि विमानाचं सुरक्षित आपत्कालीन लँडिंग सौदी अरेबियातील ताबूक येथे करण्यात आलं.

ही घटना वाचताना पहिला विचार येतो इतक्या मोठ्या संकटात माणूस एवढं शांतपणे निर्णय घेऊ शकतो तरी कसा? याचं एक उत्तर आहे “पुर्व तयारी”…

आपत्कालीन परिस्थिती कधी येईल हे कोणालाच माहीत नसतं. पण आपण त्या परिस्थितीसाठी किती तयार आहोत हे  फक्त आणि फक्त आपल्याच हातात असतं.

पायलटचं प्रशिक्षण केवळ विमान उडवण्यापुरतं नसतं. संकटाच्या क्षणी निर्णय घेणे, परिस्थितीचा अंदाज घेणे आणि काही सेकंदांत योग्य कृती करणे ही त्याच्या प्रशिक्षणाचीच परीक्षा असते आणि कदाचित म्हणूनच या घटनेतून आपल्या आयुष्यासाठीही एक महत्त्वाचा धडा मिळतो.

संधी मिळाल्यावर तयारी करण्यापेक्षा, संधी येण्याआधी स्वतःला तयार करणं महत्त्वाचं असतं.

आपल्या आयुष्यातही अचानक संकटं येतात.

नोकरी जाते. व्यवसायात नुकसान होतं.

वर्षानुवर्षांचा अभ्यास करूनही परीक्षा पास होत नाही.

एखादं मनापासून जपलेलं नातं अचानक तुटतं किंवा आपण ज्या गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवला होता तीच गोष्ट हातातून निघून जाते.

त्या क्षणी आपल्याला कदाचित या विमानासारखंच वाटायला लागतं की सगळं आपल्या नियंत्रणाबाहेर गेलंय.

पण अशा वेळी पहिला प्रश्न “हे माझ्याच बाबतीत का घडलं?” हा नसून “आता उपलब्ध असलेल्या पर्यायांमधून मी काय करू शकतो?” हा असायला हवा.

कारण संकटात परिस्थितीपेक्षा निर्णयच महत्त्वाचा ठरतो.

या घटनेत आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे.

विमान वाचवण्याचं काम फक्त एका व्यक्तीने केलं नाही.

पायलटने आपली योग्य भूमिका बजावली.बाकी प्रवाशांनी वेळीच सावधगिरी बाळगुन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी धाव घेतली.काहींनी हल्लेखोराला रोखलं.विमानातील इतर पायलट्सनी नियंत्रण स्वीकारलं.

म्हणजेच संकटाच्या वेळी प्रत्येकाने आपल्या परीने जे शक्य होतं ते केलं.यातून एक साधी पण मोठी शिकवण मिळतेआपल्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असण्याची गरज नाही; पण आपल्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणे करण्याची तयारी असली पाहिजे..

म्हणूनच या घटनेची खरी शिकवण कदाचित “धाडसी बना” एवढीच नाही.तर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार रहा. शांत रहा. परिस्थिती समजून घ्या आणि जे आपल्या हातात आहे ते करा.

कारण संकटाच्या क्षणी मोठमोठ्या घोषणा उपयोगी पडत नाहीत.त्या वेळी उपयोगी पडतो तो शांत डोकं, योग्य निर्णय आणि हार न मानण्याची वृत्ती.

विमानातील त्या १७४ जणांना कदाचित काही मिनिटांपूर्वी कल्पनाही नसेल की त्यांच्या आयुष्यात इतका मोठा प्रसंग येणार आहे तसंच आपल्याही आयुष्यात पुढच्या क्षणी काय घडणार आहे, हे आपल्याला माहीत नसतं म्हणून भविष्याची भीती बाळगण्यापेक्षा आज स्वतःला तयार करणं कदाचित जास्त महत्त्वाचं आहे….

-क्रांती शेलार, नाशिक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

error: Content is protected !!