पुणे – आगामी महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या उमेदवारीची आज रविवारी,४ ऑक्टोबर २०२६ रोजी अधिकृत घोषणा केली. दिल्लीतील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून विद्यमान आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड यांच्या नावाची जोरदार चर्चा होती; मात्र ऐनवेळी डॉ. जाधव यांना उमेदवारी देत भाजपने राजकीय वर्तुळाला धक्का दिला आहे.
डॉ. स्मिता जाधव या ‘पुढारी पब्लिकेशन्स’च्या संचालिका असून ‘पुढारी’चे अध्यक्ष व मुख्य संपादक योगेश जाधव यांच्या पत्नी आहेत. तसेच त्या डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांनी बी.ई. (कॉम्प्युटर), एम.बी.ए. (फायनान्स) आणि पीएच.डी. (एज्युकेशन)चे शिक्षण घेतले असून सध्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. महिला सक्षमीकरणासाठी ‘कस्तुरी क्लब’च्या माध्यमातून त्यांनी काम केले आहे. दरम्यान, भाजपने नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
दिल्लीत बैठकीनंतर निर्णय; पुणे पदवीधरमधून स्मिता जाधव यांना उमेदवारी
By Team LBNN
On: October 4, 2026 6:15 PM












