सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राजाळे सर्कल शाळेला संरक्षक भिंत उभारण्याची मागणी

On: October 10, 2026 1:20 PM
Follow Us:

शाळेच्या जागेची हद्द कायम करून अतिक्रमण हटविण्याची मागणी; गटविकास अधिकारी व प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

फलटण : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राजाळे सर्कल (सोनगाव), ता. फलटण येथील शाळेच्या जागेची अधिकृत हद्द निश्चित करून कथित अतिक्रमणाबाबत योग्य ती कार्यवाही करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेच्या परिसराभोवती संरक्षक कंपाऊंड किंवा भिंत उभारावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि फलटणचे प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

सदर शाळा शेती महामंडळ आणि जिल्हा परिषद सातारा यांच्यातील करारानुसार शेती महामंडळाच्या जागेत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शाळेच्या लगतच्या जागेवर काही शेतकऱ्यांकडून अतिक्रमण झाल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यामुळे शाळेच्या जागेची अधिकृत हद्द स्पष्ट करण्याची आवश्यकता असल्याचे समितीने म्हटले आहे.

शाळेच्या परिसरालगत ऊसाची शेती आणि झाडे-झुडपे असल्यामुळे साप तसेच इतर विषारी प्राणी शाळेच्या आवारात येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचा दिवसभर शाळेच्या परिसरात वावर असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी शाळेच्या परिसरात साप आढळून आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच, याच गटामध्ये २० ऑगस्ट २०२६ रोजी एका व्यक्तीला सर्पदंश झाल्याची घटना घडल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याची भूमिका शाळा व्यवस्थापन समितीने मांडली आहे.

प्रशासनाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत शाळेच्या जागेची अधिकृत मोजणी करून हद्द कायम करावी, अतिक्रमणाची पाहणी करून नियमानुसार कार्यवाही करावी आणि शाळेच्या संपूर्ण परिसराभोवती संरक्षक कंपाऊंड किंवा भिंत उभारण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने निवेदनाची तातडीने दखल घ्यावी आणि आवश्यक कार्यवाहीला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा शाळा व्यवस्थापन समितीने व्यक्त केली आहे.

हे ही वाचा  फलटण शहरात १६ ऑक्टोबरपासून पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात; स्विमिंग पूल आणि वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!