फलटण – फलटण तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतीची कामे ठप्प झाल्यामुळे शेतमजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मनरेगाअंतर्गत मजुरांना तातडीने कामे उपलब्ध करून द्यावीत, मंजूर कामे सुरू करावीत आणि कामांसाठी आवश्यक मस्टर त्वरित उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सातारा जिल्हा परिषद सदस्या सौ. वैशाली संदीप कांबळे यांनी केली. यासंदर्भात त्यांनी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी पंचायत समिती, फलटणचे गटविकास अधिकारी अक्षय घावटे यांना निवेदन दिले. यावेळी मंजुवडीचे सरपंच हनुमंत आटोळे, सामाजिक कार्यकर्ते गोळे साहेब, विशाल काकडे आदी उपस्थित होते.
बरड जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे प्राधान्याने सुरू करून मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून द्यावा, तसेच प्रशासकीय अडचणींमुळे मजुरांना कामापासून वंचित राहावे लागू नये, अशी मागणी सौ. कांबळे यांनी केली. दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवू नये आणि रोजगारासाठी स्थलांतर करण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, फलटण तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन प्रत्येक गावातील १०० लोकांना रोजगाराची कामे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी अक्षय घावटे यांनी दिल्याचे सांगण्यात आले. आता मनरेगाची कामे प्रत्यक्षात कधी सुरू होणार आणि मजुरांना रोजगार कधी मिळणार, याकडे बरड गटातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी वैशाली कांबळे आक्रमक
By Team LBNN
On: October 16, 2026 7:48 PM






