
पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत पुरस्कार प्रदान
फलटण : पर्यावरणपूरक औद्योगिक तंत्रज्ञान, शाश्वत इथेनॉल उत्पादन आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील योगदानाबद्दल फलटण येथील स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेडला ‘इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड २०२६’ प्रदान करण्यात आला. कंपनीने सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार मिळविल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली.
नवी दिल्ली येथे १४ ऑक्टोबर रोजी आयोजित कार्यक्रमात केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कंपनीच्या वतीने संचालिका कु. ताराराजे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि डिस्टिलरी विभागाचे महाव्यवस्थापक संजय पवार यांनी पुरस्कार स्वीकारला. पर्यावरण संरक्षण आणि कार्यक्षम औद्योगिक व्यवस्थापनासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणारा सर्वोत्कृष्ट साखर इथेनॉल उत्पादक या श्रेणीत कंपनीला हा सन्मान मिळाला.
कंपनीचे प्रवर्तक तथा माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज ग्रीन पॉवरने हरित ऊर्जा क्षेत्रात काम सुरू ठेवले आहे. कंपनीच्या एकात्मिक साखर, इथेनॉल आणि सहवीज निर्मिती प्रकल्पामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सांडपाणी व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण आणि संसाधनांच्या पुनर्वापरावर भर दिला जात असल्याचे सांगण्यात आले.
केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमामुळे पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळत आहे. या पार्श्वभूमीवर इथेनॉल उत्पादनातील कंपनीचा सहभाग देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी पूरक ठरत आहे. भविष्यात कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) प्रकल्प आणि आधुनिक हरित तंत्रज्ञानाच्या विकासावरही कंपनी लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती देण्यात आली.
ऊर्जा उत्पादनासोबतच शेतकरी कल्याण, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि समुदायाच्या सक्षमीकरणालाही कंपनी महत्त्व देत आहे. सलग दुसऱ्या वर्षी मिळालेल्या या पुरस्कारामुळे स्वराज ग्रीन पॉवरच्या पर्यावरणपूरक औद्योगिक उपक्रमांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली असून, फलटणच्या औद्योगिक क्षेत्रासाठीही हा गौरव महत्त्वपूर्ण मानला जात आहे.






