फलटण | सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सातारा इतिहास संशोधन मंडळाचे १७ वे वार्षिक अधिवेशन व राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. महाविद्यालयातील प्राचार्य शिवाजीराव भोसले सभागृहात होणाऱ्या या परिषदेचा मुख्य विषय ‘२० व्या शतकातील संस्थाने : फलटण संस्थानचा विशेष संदर्भ’ हा आहे. परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार असून, फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर अध्यक्षस्थानी असतील. प्राचार्य डॉ. विजयराव नलावडे बीजभाषण करणार आहेत. इतिहास संशोधन व लेखन क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
या राष्ट्रीय परिषदेत फलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, संस्थानकालीन प्रशासन, तत्कालीन राजकीय घडामोडी आणि स्वातंत्र्यानंतर संस्थानाच्या भारतातील विलीनीकरणाची प्रक्रिया यांवर संशोधनात्मक चर्चा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याशी फलटणच्या नाईक-निंबाळकर घराण्याचे असलेले ऐतिहासिक संबंधही या अभ्यासाचा महत्त्वाचा भाग असतील. कार्यक्रमात सकाळी उद्घाटन व बीजभाषणानंतर शोधनिबंध वाचनाची सत्रे होणार असून, सायंकाळी समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील इतिहास विभागप्रमुख डॉ. अवनीश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनामुळे प्राध्यापक, संशोधक, इतिहास अभ्यासक आणि विद्यार्थ्यांना संशोधनपर विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळणार आहे. स्थानिक इतिहासाचे दस्तऐवजीकरण आणि फलटण संस्थानाच्या ऐतिहासिक वारशाचा चिकित्सक अभ्यास करण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. संयोजक डॉ. ए. एस. टिके, समन्वयक प्रा. (डॉ.) एस. टी. कदम आणि प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी इतिहासप्रेमी, संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
मुधोजी महाविद्यालयात इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन; डॉ. आ. ह. साळुंखे यांना पुरस्कार
By Team LBNN
On: October 16, 2026 7:29 PM











