१८ पाणी साठवण योजनांचा आढावा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
फलटण : अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. तालुक्यातील कोणत्याही गावाला पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहू दिले जाणार नाही, अशी ग्वाही आमदार सचिन पाटील यांनी दिली.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या फलटण उपविभागांतर्गत १८ पाणी साठवण योजनांचा आढावा घेतला. यावेळी उपलब्ध पाणीसाठ्याची पाहणी करून संभाव्य टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली.
विडणी, निंबलक, पिंप्रद, राजाळे, सोमंथळी, गिरवी, धुळदेव आणि वाठार निंबाळकर येथील साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मात्र, सोनगाव आणि सरडे येथील तलावांना विद्युतपुरवठा जोडण्याचे काम प्रलंबित असल्याने ते रिकामे आहेत. शिंदेवाडी येथील तलावासाठी विद्युत रोहित्र स्थलांतरित करण्याचे कामही अपूर्ण असल्याचे पाहणीत निदर्शनास आले.
या कामांची दखल घेत आमदार सचिन पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सोनगाव, सरडे आणि शिंदेवाडी येथील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. नीरा उजवा कालव्याचे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन उपलब्ध झाल्यानंतर या तलावांमध्ये पाणीसाठा करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, होळ-खामगाव, निंभोरे, सस्तेवाडी आणि ठाकूरकी-फरांदवाडी येथील पाणी साठवण तलावांची कामे प्रगतिपथावर आहेत. ही कामे लवकर पूर्ण करून योजना कार्यान्वित करण्याच्या सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
भविष्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास साठवण तलावांमधून टँकरद्वारे संबंधित गावांना पाणीपुरवठा करता येणार आहे. त्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करावे आणि प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश आमदार सचिन पाटील यांनी दिले. या पाहणी दौऱ्यावेळी संबंधित गावांतील नागरिक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि कंत्राटदार उपस्थित होते.
फलटण तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू देणार नाही : आमदार सचिन पाटील
By Team LBNN
On: October 16, 2026 4:06 PM












