कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये महिलांचे आरोग्य दुर्लक्षित; शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्याची वेळ – स्वतःची काळजी घेणे स्वार्थ नव्हे, तर प्रत्येक स्त्रीचा हक्क!
“मॅडम, आत्ता नाही… थोडं पुढे करूया.”
एखाद्या महिलेला शस्त्रक्रियेची गरज असल्याचे सांगितल्यानंतर तिचे पुढचे वाक्य अनेकदा शस्त्रक्रियेबद्दल नसते, तर ते तिच्या कुटुंबातील जबाबदाऱ्यांबद्दल असते.
“मॅडम, मुलांच्या परीक्षा आहेत…”
“सासू-सासऱ्यांकडे कोण बघणार?”
“घरी पाहुणे येणार आहेत…”
“मुलाचं लग्न आहे…”
“नवऱ्याला माझ्याशिवाय जमत नाही…”
“आधी घरातलं सगळं आटोपते, मग करते.”
अशा अनेक कारणांमुळे महिला शस्त्रक्रियेची तारीख पुढे ढकलत राहतात. एक आठवडा, एक महिना आणि कधी कधी त्याहूनही अधिक काळ उपचार पुढे जातात. कारण घरातील प्रत्येकाची काळजी घेणे ही तिची जबाबदारी असते; मात्र स्वतःची काळजी घेणे तिच्या प्राधान्यक्रमात शेवटी असते.
हे चित्र पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, आपण स्त्रियांना इतके ‘सगळे सांभाळणे’ शिकवले आहे की, स्वतःला सांभाळणेही त्यांना कधी कधी स्वार्थीपणाचे वाटते.
नवरात्री आली की आपण स्त्रीला देवी म्हणतो. तिच्या शक्तीची, त्यागाची आणि कर्तृत्वाची स्तुती करतो. पण खरोखरच तिला कायम ‘सुपरवुमन’ असण्याची गरज आहे का?
देवीच्या नऊ रूपांमध्ये नऊ वेगवेगळ्या शक्ती आणि गुण आहेत. एकाच रूपात सर्वकाही असण्याची अपेक्षा नाही. मग एका स्त्रीकडूनच सर्वगुणसंपन्न असण्याची अपेक्षा का?
ती करिअर सांभाळेल, मुलांना सांभाळेल, घर सांभाळेल, नाती जपेल, कुटुंबातील प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेईल आणि सर्वांच्या गरजा लक्षात ठेवेल. मात्र स्वतःच्या बाबतीत तिचे एकच उत्तर असते – ‘माझं नंतर बघू.’
हे ‘नंतर’ मात्र तिच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी पुढे ढकलत राहते.
तिची नियमित आरोग्य तपासणी पुढे जाते. औषधे वेळेवर घेणे राहून जाते. मासिक पाळीतील बदलांकडे दुर्लक्ष होते. सततचा थकवा हा कामाचा परिणाम असेल, असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. एखादा त्रास वाढत असतानाही डॉक्टरांकडे जाण्याआधी घरातील दहा कामे पूर्ण करण्याचा विचार केला जातो.
आणि मग प्रश्न उपस्थित होतो – स्त्रिया स्वतःच्या आरोग्याकडे इतके दुर्लक्ष का करतात?
कदाचित कारण त्यांना लहानपणापासून स्वतःपेक्षा इतरांना आधी प्राधान्य द्यायला शिकवले जाते. मात्र स्वतःची काळजी घेणे हा स्वार्थ नाही, तर तो त्यांचा हक्क आहे.
स्वतःसाठी वेळ काढणे म्हणजे कुटुंबाकडे दुर्लक्ष करणे नव्हे. स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणे म्हणजे इतरांवरील प्रेम कमी होणे नव्हे. उलट, कुटुंबाची काळजी घेण्यासाठीही स्त्री स्वतः निरोगी आणि सक्षम असणे गरजेचे आहे.
म्हणून प्रत्येक स्त्रीने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा – ‘मी सगळ्यांसाठी इतकं करते… पण माझ्यासाठी काय करते?’
कधी मुलांच्या परीक्षा असतील, कधी पाहुणे असतील, कधी घरात लग्नकार्य असेल, तर कधी सासू-सासऱ्यांची जबाबदारी असेल. या जबाबदाऱ्या आयुष्यात कायम येत राहणार आहेत. मात्र तिचे शरीर आणि आरोग्य हीदेखील तिचीच जबाबदारी आहे.
प्रत्येक गोष्ट सगळे आटोपल्यानंतरच करायची असेल, तर कदाचित स्वतःसाठी वेळ कधीच मिळणार नाही. त्यामुळे आरोग्यविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. नियमित तपासणी करावी आणि डॉक्टरांनी दिलेला उपचारांचा सल्ला गांभीर्याने घ्यावा. शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास ती केव्हा करणे योग्य आहे, याबाबत डॉक्टरांशी चर्चा करून निर्णय घ्यावा.
तिला प्रत्येक वेळी खंबीर असण्याची गरज नाही. प्रत्येकाची काळजी घेण्याची किंवा सर्वकाही एकटीने करण्याचीही गरज नाही. तिलाही स्वतःला प्राधान्य देण्याचा पूर्ण अधिकार आहे.
कारण ती फक्त कोणाची आई नाही, फक्त कोणाची पत्नी नाही, फक्त कोणाची मुलगी, सून किंवा बहीण नाही. ती स्वतःही एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तिचे स्वतःचे शरीर आहे, स्वतःचे आरोग्य आहे, स्वतःची स्वप्ने आहेत आणि स्वतःचे आयुष्य आहे.
या दिवाळीत तिला ‘सुपरवुमन’ बनवण्याऐवजी एक स्त्री आणि एक माणूस म्हणून स्वीकारूया. तिच्याकडून सगळे काही करण्याची अपेक्षा ठेवण्याऐवजी तिलाही आधार देऊया.
तिला एवढेच सांगूया…
“सगळ्यांची काळजी घेतलीस… आता थोडी स्वतःचीही घे!”
—
लेखिका : डॉ. शिल्पा गांधी
एम.एस. (जनरल सर्जरी)
कनकवंदना मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल, फलटण













