सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

आषाढी एकादशी :
“भक्ती, समता आणि आत्मजागृतीचा महाउत्सव”

On: July 25, 2026 10:31 AM
Follow Us:

“ज्ञानोबा-तुकाराम!” या जयघोषाने अवघा महाराष्ट्र दुमदुमून जातो आणि लाखो वारकऱ्यांची पावले आपसूकच पंढरपूरच्या दिशेने वळतात. डोक्यावर तुळशीवृंदावन, हातात टाळ-मृदंग, मुखी हरिनाम आणि हृदयात विठ्ठलावरील अढळ श्रद्धा घेऊन चालणारा वारकरी केवळ एक यात्रेकरू नसतो तो भक्ती, समता, प्रेम आणि मानवतेचा संदेशवाहक असतो. म्हणूनच की काय आषाढी एकादशी हा केवळ धार्मिक सण नाही तर तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, संतपरंपरेचा आणि सामाजिक एकात्मतेचा महाउत्सव आहे.
आषाढ शुद्ध एकादशीला भगवान श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरात एकत्र येतात. या दिवशी उपवास, नामस्मरण, भजन, कीर्तन आणि विठ्ठलभक्तीला विशेष महत्त्व असते. पण आषाढी एकादशीचा खरा अर्थ केवळ उपवास किंवा मंदिरदर्शनात नाही तो आपल्या मनातील विकारांचा त्याग करून सदाचार, संयम आणि प्रेमाचा स्वीकार करण्यात आहे.

वारकरी परंपरा : एका चालते-बोलते अध्यात्म

महाराष्ट्राची वारकरी परंपरा ही जगातील अद्वितीय सांस्कृतिक परंपरांपैकी एक मानली जाते. शेकडो वर्षांपासून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आळंदी आणि देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या वारीत जात, धर्म, श्रीमंती, गरिबी, स्त्री-पुरुष असा कोणताही भेद राहत नाही. सर्वजण “माऊली” म्हणून एकमेकांना संबोधतात. ही समानतेची भावना भारतीय लोकशाहीच्या आणि मानवतेच्या मूलभूत मूल्यांना अधिक बळकट करणारी आहे.
वारकरी हजारो किलोमीटर चालतो पण त्याचा प्रवास फक्त पायांचा नसतो तर तो मनाचा असतो. प्रत्येक पावलागणिक अहंकार झिजतो, स्वार्थ कमी होतो आणि माणुसकी अधिक दृढ होते. म्हणूनच वारी ही केवळ तीर्थयात्रा नसून ती आत्मपरिवर्तनाची प्रक्रिया आहे.

संतांचा विचार : आजही तितकाच समर्पक

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत सावता माळी, संत गोरा कुंभार यांसारख्या संतांनी भक्तीच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. त्यांनी कर्मकांडापेक्षा सदाचाराला, जातीपेक्षा माणुसकीला आणि अहंकारापेक्षा प्रेमाला महत्त्व दिले.
संत तुकाराम महाराज म्हणतात ,
“जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले; तोचि साधू ओळखावा, देव तेथेंचि जाणावा.”
या एका अभंगात संपूर्ण मानवतेचा संदेश दडलेला आहे. खऱ्या भक्तीचा अर्थ मंदिरात दिवा लावण्यात नसून दुसऱ्याच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवण्यात आहे.

विठ्ठल म्हणजे कोण?
विठ्ठल म्हणजे केवळ मंदिरातील काळ्या दगडाची मूर्ती नव्हे. विठ्ठल म्हणजे कष्टकरी शेतकऱ्याच्या घामात आहे, आईच्या ममतेत आहे, सैनिकाच्या त्यागात आहे, शिक्षकाच्या ज्ञानदानात आहे, डॉक्टराच्या सेवेत आहे आणि गरजवंताला मदतीचा हात देणाऱ्या प्रत्येक माणसात आहे.
हात कमरेवर ठेवून विटेवर उभा असलेला विठ्ठल जणू सांगतो “मी तुझ्या जवळच आहे; फक्त तुझी दृष्टी निर्मळ असावी.”

वारी म्हणजे जीवनाची शाळा

वारी आपल्याला केवळ देवापर्यंत पोहोचायला शिकवत नाही तर माणूस म्हणून जगायलाही शिकवते. जीवनात कितीही संकटे आली, कितीही अपयश आले, तरी चालणे थांबवायचे नाही हा धडा वारकरी आपल्या कृतीतून देतो. पायांना फोड आले तरी ओठांवर “राम कृष्ण हरी” असते. उन्हाचा तडाखा असो, मुसळधार पाऊस असो किंवा थकवा असो या वारकऱ्यांची पावले थांबत नाहीत. कारण त्यांना विश्वास असतो की प्रत्येक पाऊल त्यांना विठ्ठलाच्या अधिक जवळ घेऊन जात आहे.

खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यात एक “वारी” सुरू असते. कुणी शिक्षणासाठी झटत असतो, कुणी कुटुंबासाठी, कुणी समाजासाठी, तर कुणी स्वतःच्या स्वप्नांसाठी. या प्रवासात अडचणी येणारच पण त्या अडचणींवर मात करून पुढे चालत राहणे हाच विठ्ठलाचा संदेश आहे.
     खरंतर विठ्ठल बाहेर नाही तो आपल्या आचरणात आहे
आज आपण देव शोधण्यासाठी मोठमोठ्या मंदिरांमध्ये जातो पण देवाला माणसांमध्ये पाहण्याचा प्रयत्न अनेकदा विसरतो. उपाशी माणसाला अन्न देणे, निराश व्यक्तीला धीर देणे, वृद्धांचा सन्मान करणे, निसर्गाचे रक्षण करणे आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडणे यापेक्षा मोठी पूजा कोणती?जेव्हा आपल्या हातून एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू उमटते तेव्हा विठ्ठल आपल्या कर्मात उतरतो. जेव्हा आपण स्वार्थापेक्षा परमार्थ निवडतो तेव्हा विठ्ठल आपल्या विचारात जागा करतो आणि जेव्हा आपण प्रत्येक माणसात देव पाहू लागतो तेव्हा पंढरपूर आपल्या अंतःकरणातच उभे राहते….

आधुनिक काळातील आषाढी एकादशी

आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माणूस प्रगती करत असला तरी मानसिक ताण, स्पर्धा, नैराश्य आणि स्वार्थही वाढताना दिसतो. अशा काळात आषाढी एकादशी आपल्याला अंतर्मुख होण्याची संधी देते. मोबाईल, सोशल मीडियाच्या आभासी जगातून काही क्षण बाहेर पडून स्वतःशी संवाद साधण्याची प्रेरणा देते.
उपवासाचा खरा अर्थ केवळ अन्नत्याग नाही तर वाईट विचारांचा त्याग, कटू शब्दांचा त्याग, राग-द्वेषाचा त्याग आणि लोभाचा त्याग हा देखील आहे. जर आपण एका दिवसासाठी तरी खोटे बोलणे, दुसऱ्याची निंदा करणे, रागावणे आणि स्वार्थी वागणे टाळले तर तीच खरी एकादशी ठरेल.

पर्यावरण आणि वारी

वारकरी परंपरा आपल्याला निसर्गाशी सुसंवाद साधायलाही शिकवते. पायी चालणे, साधेपणा, सामूहिक जीवन, संसाधनांचा संयमी वापर आणि स्वच्छतेवर भर हे वारकरी संस्कृतीचे महत्त्वाचे पैलू आहेत. आजच्या पर्यावरणीय संकटाच्या पार्श्वभूमीवर या मूल्यांचे महत्त्व अधिक वाढले आहे.जर प्रत्येक वारकरी प्लास्टिकमुक्त वारी, स्वच्छता, वृक्षारोपण आणि पाण्याची बचत याचा संकल्प करेल तर भक्तीबरोबरच पर्यावरणसेवाही घडेल.

आषाढी एकादशीचा खरा संदेश

आज समाजाला गरज आहे ती भक्ती आणि विज्ञान, श्रद्धा आणि विवेक, अध्यात्म आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर समतोल साधण्याची. विठ्ठलभक्ती म्हणजे वास्तवापासून पळ काढणे नव्हे तर वास्तवाला अधिक सामर्थ्याने सामोरे जाण्याची प्रेरणा आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येतात पण वारकरी आपल्याला शिकवतो की प्रवास कितीही कठीण असो, पावले थांबू नयेत. श्रद्धा, संयम आणि सकारात्मकता असेल तर प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील “पंढरपूर” गाठता येते.
आषाढी एकादशी हा दिवस आपल्याला सांगतो की देव शोधण्यासाठी दूर जाण्याची गरज नाही. जेव्हा आपल्या मनात प्रेम, ओठांवर सत्य, हातात सेवा आणि जीवनात प्रामाणिकपणा असतो तेव्हाच विठ्ठल आपल्या अंतःकरणात प्रकट होतो.
चला तर मग, या आषाढी एकादशीला केवळ उपवास न करता आपल्या मनातील अहंकार, मत्सर आणि द्वेष यांचाही त्याग करूया. प्रत्येकामध्ये विठ्ठल पाहण्याचा प्रयत्न करूया. कारण जिथे माणुसकी आहे तिथेच विठ्ठल आहे आणि जिथे विठ्ठल आहे, तिथेच आनंद, शांती आणि समाधान आहे.
“राम कृष्ण हरी,ज्ञानोबा-तुकाराम!” या अखंड नामघोषात आपणही सहभागी होऊया आणि भक्तीबरोबरच मानवतेची वारी आपल्या आयुष्यात अखंड सुरू ठेवूया.

या सर्व लेखा सोबत आजच्या तरुणांसाठी पुन्हा एकदा वारीचा संदेश द्यावासा वाटतो….आजची पिढी प्रचंड स्पर्धा, ताणतणाव आणि अनिश्चिततेच्या काळातून जात आहे. यश मिळवण्याच्या धावपळीत मनःशांती हरवत चालली आहे. अशा वेळी वारी आपल्याला सांगते वेगापेक्षा दिशा महत्त्वाची आहे. संपत्तीपेक्षा समाधान मोठे आहे. प्रसिद्धीपेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे.मोबाईलच्या स्क्रीनवर हजारो मित्र मिळतील..पण वारी शिकवते की खरा मित्र तोच, जो संकटात तुमच्या खांद्याला खांदा लावून चालतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही करुणा, सहवेदना आणि प्रेम यांना पर्याय नाही.जर जीवनात कधी अंधार वाटला, तर वारकऱ्यांच्या पावलांकडे पाहा.जर आत्मविश्वास डळमळला तर संतांच्या अभंगांकडे पाहा.जर अहंकार वाढला तर विटेवर उभ्या विठ्ठलाकडे पाहा आणि जर जीवनाचा अर्थ हरवला तर वारीकडे पाहा कारण वारी प्रत्येकाला सांगते…
“थांबू नकोस,चालत राहा”
आजचा थकवा उद्याच्या दर्शनात विसरला जाईल.
आजचे अश्रू उद्याच्या समाधानात विरघळून जातील.
आणि आजचा संघर्ष उद्याच्या यशाचा पाया बनेल….

ही आषाढी एकादशी हा केवळ कॅलेंडरवरील एक दिवस नाही ती आपल्या अंतर्मनाला जागवणारी अनुभूती आहे. विठ्ठल हा श्रद्धेचा विषय असला तरी त्याचा संदेश हा संपूर्ण मानवजातीसाठी आहे “प्रेम करा, सेवा करा, सत्य जगा आणि कर्तव्य निभवा”.
– कु.क्रांती ज्ञानेश्वर शेलार, नाशिक
९१५८३८५६९०

हे ही वाचा  सौ. प्रतिभाताई शिंदे व श्री. चेतन शिंदे यांच्या हस्ते 'लोकशाही भारत न्यूज'च्या आषाढी एकादशी विशेषांकाचे प्रकाशन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!