फलटण : फलटण तालुक्यात पावसाच्या अभावामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतातील पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर बरड गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. वैशाली संदीप कांबळे यांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू करावेत, तसेच पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये आणि वाड्या-वस्त्यांवर पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकरी आणि शेतमजुरांना रोजगार मिळावा, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तातडीने कामे सुरू करावीत. तसेच बंद पडलेल्या नळ पाणीपुरवठा योजना विशेष निधी उपलब्ध करून पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. “शेतकरी आणि पशुपालकांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने विलंब न करता ठोस निर्णय घ्यावेत. अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल,” असा इशारा सौ. वैशाली संदीप कांबळे यांनी दिला.
या मागण्यांसंदर्भात फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव आणि प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार तुषार देशमुख यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. वैशाली कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अक्षय सोनवलकर पाटील, अजय सुळ, निरंजन पिसाळ, सुहास भंडलकर, विशाल काकडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते आणि दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी, पशुपालक व ग्रामस्थांना कधी दिलासा मिळतो, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
फलटण तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती; चारा छावण्या व पाण्याच्या टँकरची वैशाली कांबळे यांची मागणी
By Team LBNN
On: October 15, 2026 2:23 PM






