फलटण – फलटण शहरात नव्याने विकसित होत असलेल्या पालखी मार्गावर आकर्षक विद्युत पथदिवे बसविण्यात आले असून नागरिकांनी या रोषणाईचे सुरुवातीला स्वागत केले. मात्र गेल्या काही दिवसांत या मार्गावर घडलेल्या सलग घटनांमुळे या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
काही दिवसांपूर्वी फलटण एसटी स्थानकासमोर एसटी बसचा धक्का लागून एक विद्युत पथदिवा कोसळला होता. सुदैवाने त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. त्यानंतर विद्युत पुरवठ्यासाठी बसविण्यात आलेल्या बॉक्सला विजेचा धक्का लागून एका गाढवाचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे विद्युत सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली होती.
दरम्यान, रविवार दि. २६ जुलै २०२६ रोजी भर बाजाराच्या दिवशी पुन्हा एकदा मोठी दुर्घटना टळली. फलटण येथील शासकीय विश्रामगृहासमोरील विद्युत पथदिवा एका वाहनाला अडकलेल्या दोरीमुळे जागेवरून खाली कोसळला. त्यावेळी बाजारात भाजी विक्रीसाठी बसलेल्या दोन ते तीन विक्रेत्यांवर हा खांब पडल्याने त्यांना दुखापत झाली. सुदैवाने खांब थेट डोक्यावर न पडल्याने मोठी जीवितहानी टळली; अन्यथा गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
नवीन पालखी मार्गावरील विद्युत रोषणाईचे कौतुक होत असले, तरी वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे हे काम दर्जेदार पद्धतीने झाले आहे का, तसेच सुरक्षिततेचे सर्व निकष पाळण्यात आले होते का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. या अपघातात जखमी झालेल्या भाजी विक्रेत्यांच्या उपचाराचा खर्च कोण उचलणार, त्यांना नुकसानभरपाई दिली जाणार का, तसेच संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, असे प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, जखमींना योग्य ती मदत व नुकसानभरपाई द्यावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
फलटणच्या पालखी मार्गावरील विद्युत पथदिवा पुन्हा कोसळला ; कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह, जबाबदार कोण?
By Team LBNN
On: July 26, 2026 5:11 PM









