सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटण तालुक्याच्या विकासासाठी माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर आणि आपण कटिबद्ध असून विकासकामांमध्ये कुठेही कमी पडणार नाही – आमदार सचिन पाटील

On: August 13, 2026 6:13 PM
Follow Us:

फलटण : फलटण तालुकास्तरीय मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना समिती, अतिक्रमण नियमाकुल आढावा समिती, एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती आणि दक्षता समितीच्या बैठका आज पंचायत समिती, फलटण येथील सभागृहात आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या.

मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेंतर्गत फलटण तालुक्यात पानंद रस्ते विकसित करण्यासाठी एकूण ५७ किलोमीटर अंतरासाठी निधी मंजूर झाला आहे. या कामांसाठी आमदार सचिन पाटील यांच्या विशेष प्रयत्नांचा उल्लेख करण्यात आला. मंजूर रस्त्यांच्या कामांची सद्यस्थिती, गुणवत्ता आणि दर्जा याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला.

तालुक्यातील वहिवाटीचे सुमारे ८०० रस्ते विकसित करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. मंजूर पानंद रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांच्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना आमदार सचिन पाटील यांनी दिल्या.

अतिक्रमण नियमाकुलीकरणाच्या प्रस्तावांचा आढावा

महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार फलटण शहरासह ग्रामीण भागातील शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियमाकुल करण्याच्या प्रक्रियेचा बैठकीत आढावा घेण्यात आला. गावनिहाय अतिक्रमण प्रस्तावांची माहिती घेण्यात आली असता अनेक गावांमधून अद्याप प्रस्ताव सादर झाले नसल्याचे निदर्शनास आले.

ग्रामसेवक, तलाठी आणि मंडलाधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अतिक्रमणांचे प्रस्ताव तातडीने दाखल करावेत आणि नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करावे, असे निर्देश देण्यात आले. शासनाच्या धोरणानुसार पात्र नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, असेही आमदारांनी स्पष्ट केले.

अतिक्रमण नियमाकुलीकरणाच्या माध्यमातून बेघर कुटुंबांना हक्काची जागा मिळावी आणि त्यानंतर घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आमदार सचिन पाटील यांनी सांगितले.

ग्रामीण आरोग्य सुविधांचा आढावा

एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या बैठकीत तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील गरोदर महिलांची आरोग्य तपासणी व तत्काळ सेवा, रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरे, नेत्र तपासणी, नेत्रदान जनजागृती, कुटुंब नियोजन, कर्करोग तपासणी, लसीकरण, अवयवदान, रुग्णवाहिका सेवा आणि साथीच्या आजारांवरील उपाययोजनांवर चर्चा झाली.

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थिती, उपलब्ध मनुष्यबळ, औषधसाठा, लसींचा साठा आणि आरोग्य सुविधांचाही आढावा घेण्यात आला.

फलटण तालुक्यात शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना २४ तास आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कटिबद्ध राहावे, अशा सूचना आमदार सचिन पाटील यांनी दिल्या. रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावी आणि सेवेत कोणतीही निष्काळजीपणा होऊ नये, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी उपस्थितांनी अवयवदानाची प्रतिज्ञा घेतली.

दक्षता समितीत १३ विषयांवर चर्चा

यानंतर तालुकास्तरीय दक्षता समितीची बैठक झाली. मागील बैठकीचे इतिवृत्त सादर करण्यात आले. आजच्या बैठकीत फलटण तालुक्यातील एकूण १३ महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

यामध्ये अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल गुन्हे आणि त्यावर झालेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. दलित वस्त्यांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत समितीमार्फत निवेदन देण्यात आले.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून दलित वस्त्यांच्या विकासासाठी निधी उपलब्ध झाल्याबद्दल तसेच फलटण नगरपालिकेतील सभागृहाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा निर्णय झाल्याबद्दल दक्षता समितीच्या वतीने अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

फलटण तालुक्याच्या विकासासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आपण कटिबद्ध असून विकासकामांमध्ये कुठेही कमी पडणार नाही, असे आमदार सचिन पाटील यांनी यावेळी सांगितले. शासनाच्या विविध योजना आणि विकासकामे तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासोबतच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन फलटण तालुका सुजलाम्-सुफलाम् करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीस प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, फलटण नगरपालिका मुख्याधिकारी श्री निखिल जाधव, गटविकास अधिकारी अक्षय घावटे, तालुका आरोग्य अधिकारी कोंडके, पंचायत समिती सभापती शिवांजली भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हे ही वाचा  श्रीमंत संजीवराजेंच्या मागणीला परिवहन मंत्र्यांचा प्रतिसाद; फलटण आगाराला नवीन एसटी बसेस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!